युनानी उपचाराच्या नावाखाली वृध्देला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:06 AM2021-01-18T04:06:17+5:302021-01-18T04:06:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : युनानी उपचाराच्या नावाखाली वृध्देला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी गुन्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : युनानी उपचाराच्या नावाखाली वृध्देला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल करून एम. एच. बी. पोलीस अधिक तपास करत आहेत.
कांदीवली परिसरात राहणाऱ्या ६० वर्षीय तक्रारदार या शासकीय टेलीफोन कंपनीतून निवृत्त झाल्या आहेत. २३ डिसेंबरला त्या बोरीवलीमध्ये गेल्या असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांना अडवले. त्याने आपले नाव राजेंद्र जैन असल्याचे सांगत त्याच्या ओळखीचे डॉक्टर युनानी पध्दतीने उपचार करत असल्याची बतावणी केली.
तक्रारदार यांच्या आईची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनीही ठगावर विश्वास ठेवत त्याला घरी आणले. ठगाने घरी येत आईची तपासणी करत आईच्या पायामध्ये पित्त झाल्याची बतावणी केली. एक चांदीच्या शंकूच्या आकाराचे नरसाळे व ब्लेडचा वापर करून त्यांनी पायातून पिवळ्या रंगाचा द्रव काढला. ते रक्तातील पित्त असल्याचे सांगत थेरपीचे बिल १ लाख ६५ हजार झाल्याचे सांगितले. तडजोड करून त्यांनी दर्शना यांच्या कुटुंबीयांकडून दीड लाख रुपये घेतले.
आईच्या पुढील तपासादरम्यान तिच्या पाठीतही पित्त झाल्याचे सांगून पाठीचीही थेरपी करणे आवश्यक असल्याचे ठगाने सांगितले. तक्रारदार यांनी आई लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून होकार दिला. मात्र त्याआधीच गुडघ्यातून द्रव काढून युनानी उपाचाराच्या नावाखाली बोगस डॉक्टरांकडून फसवणूक सुरू असल्याची माहिती तक्रारदार यांना मिळाली. त्यात, आईच्या तब्येतीतही सुधारणा झाली नाही.
अशात आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.