मुंबई
टेलिफोन सेवा सुरू करण्याच्या नावाखाली ६४ वर्षीय वृद्धाला १० रुपयांचे क्षुल्क भरण्यास सांगून ६४ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार माहीममध्ये घडला. माहीम परिसरात राहणारे ६४ वर्षीय तक्रारदार यांना एमटीएनएलमधून बोलत असल्याचे सांगून अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. दरम्यान, केवायसी अपडेट न केल्यामुळे एमटीएनएल सेवा बंद होत असल्याचे सांगितले, तसेच सेवा सुरू करण्यासाठी एक लिंक पाठवून त्यात माहिती भरण्यास सांगत १० रुपये क्षुल्क भरण्यास सांगितले. त्याप्रमाणे वृद्धानी पैसे भरताच मोबाइलवर आलेला ओटीपी सांगण्यास भाग पाडत खात्यातील ६४ हजार रुपयांवर हात साफ केला. तक्रारदाराला संशय येताच त्यांनी अज्ञात व्यक्तीला फोन केला; पण त्या व्यक्तीचा फोन नॉट रिचेबल आला. अखेर तक्रारदारांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी माहीम पोलीस अधिक तपास करीत आहेत.