लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मदत संपलेले पदार्थ दिल्यामुळे विषबाधा झाल्याचे सांगून तोतया एफडीए अधिकाऱ्यांनी दुकानदाराकडून १० हजार उकळल्याचा प्रकार कुलाबा येथे समोर आला. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुलाबा कॉजवे रोड परिसरात राहणाऱ्या तक्रारदारांचे झेरॉक्स आणि मेडिकलचे दुकान आहे. ७ जून रोजी त्यांच्या मेडिकलमधील लँडलाइन क्रमांकावर अनोळखी व्यक्तीने कॉल करून एफडीए अधिकारी असल्याचे सांगितले. मुदत संपलेला ब्राँनोविटा विकल्यामुळे विषबाधा झाल्याचे सांगितले. तसेच गुन्हा दाखल करत मेडिकल परवाना रद्द करण्याची भीती घातली.
कारवाई टाळण्यासाठी १८ हजार ३०० रुपये दंड भरण्यास सांगितला. त्यांनी १० हजार रुपये गुगल पे केले. मात्र, पैसे भरूनही पावती न पाठविल्यामुळे त्यांना संशय आला. त्यानुसार कुलाबा पोलीस ठाणे गाठून त्यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.
.........................................