Join us

‘नो ब्रोकर डॉट कॉम’वरून आयकर आयुक्तांच्या सचिव महिलेला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:05 AM

मुंबई : घर भाड्याने घेण्याच्या नावाखाली तोतया जवानाने आयकर आयुक्तांकडे निजी सचिव म्हणून कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्याची २४ हजार ...

मुंबई : घर भाड्याने घेण्याच्या नावाखाली तोतया जवानाने आयकर आयुक्तांकडे निजी सचिव म्हणून कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्याची २४ हजार रूपयांना फसवणूक केली आहे. महिला अधिकारी वेळीच सतर्क झाल्यामुळे त्यांची फसवणूक टळली. याप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

बोरिवली परिसरात राहणाऱ्या तक्रारदार या आयकर आयुक्तांच्या निजी सचिव म्हणून कार्यरत आहेत. बोरिवलीतील घर भाड्याने द्यायचे असल्यामुळे त्यांनी २ जुलै रोजी ‘नो ब्रोकर डॉट कॉम’वर जाहिरात दिली. त्यातच जोरासिंग नावाच्या व्यक्तीने व्हॉट्सॲपमार्फत संपर्क साधला आणि घर भाड्याने घेण्याबाबत रस दाखवला. जोरासिंग याने तो भारतीय सैन्य दलात कार्यरत असल्याचे सांगितले. सध्या मुंबईत बदली झाली असल्यामुळे घर हवे असल्याचे सांगितले. पुढे घर भाड्याने घेण्याचे ठरले. जोरासिंगने मोबाईलवर पाठवलेला क्युआर कोड स्कॅन करताच पैसे अकाऊंटवर जमा होतील, असे महिला अधिकाऱ्याला सांगितले. तसेच विश्वास संपादन करण्यासाठी ठगाने नोकरीचे आय. डी. कार्ड, कॅन्टीन कार्ड, व्हॉट्सॲपवर पाठवले होते. त्यानंतर त्याने पाठवलेल्या क्युआर कोडवर स्कॅन करताच सुरूवातीला ५ रुपये वजा झाले. ते त्याने पुन्हा पाठवले. पुढे आणखीन ५० रुपये वजा झाले तेदेखील त्याने पुन्हा पाठविल्यानंतर त्यांचा विश्वास बसला. पुढे आणखीन एक क्युआर कोड स्कॅन करताच त्यांच्या खात्यातून २४ हजार ५०० रुपये वजा झाले. जोरासिंगने ते पुन्हा पाठविले नाहीत. उलट दुसरा कोड केल्यानंतर ते पैसे जमा होतील, असे सांगितले.

महिला अधिकाऱ्याला संशय आल्याने त्यांनी आधी पैसे परत पाठविण्यास सांगितले. तेव्हा ठगाने टाळाटाळ सुरु केली. त्यांनीही वेळीच सतर्क होत संपर्क टाळला. त्यामुळे पुढील फसवणूक टळली. यात त्यांची २४ हजार ४५० रूपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी बुधवारी महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.