Join us

गांधी ग्लोबल सोलर यात्रेला आग्नेय आशियातून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 15:41 IST

५०हून अधिक देशांत पोहोचणार; १० लाखांहून अधिक विद्यार्थी सोलर अॅम्बॅसिडर तयार करणार

मुंबई : आज जग ऊर्जेच्या संदर्भात एका विरोधाभासाच्या तिठ्यावर उभे आहे. एकीकडे धोरणकर्ते अब्जावधी लोकांना वीज उपलब्ध करून देण्यावर भर देत आहेत, तर दुसऱ्या बाजूला हवामान बदलाला तोंड देण्याचे मोठे आव्हान आहे. जग यापूर्वीच सुमारे १° सेल्सिअसने उष्ण झाले आहे. हवामान बदलाचे परिणाम अत्यंत गंभीर आहेत आणि म्हणूनच २०५० सालापर्यंत, केवळ ३१ वर्षांत जगाला नूतनीकरणीय ऊर्जा वापर १०० टक्क्यांपर्यंत न्यावा लागणार आहे, असे २०१८ सालच्या आयपीसीसी अहवालात म्हटले आहे. 

आयआयटी मुंबईतील ऊर्जाविज्ञान आणि इंजिनीअरिंग विभागातील प्राध्यापक चेतन एस. सोळंकी यासंदर्भात म्हणाले की, महात्मा गांधींच्या “ग्रामस्वराज” या सुप्रसिद्ध तत्त्वज्ञानाच्या धर्तीवर “ऊर्जा स्वराज” (एनर्जी स्वराज) आणण्याची हीच वेळ आहे. प्रा. सोळंकी म्हणाले, “शाश्वत स्थानिक ऊर्जा स्वयंपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी गांधी ग्लोबल सोलर यात्रा (जीजीएसवाय) आखण्यात आली आहे. हे विशेषत: ऊर्जा उपलब्ध नसणाऱ्यांसाठी आहे, कारण, आज सातही दिवस चोवीस तास, संपूर्णपणे, परवडण्याजोग्या दरात, खात्रीशीर व शाश्वत सौरऊर्जा पुरवणे शक्य आहे. यामुळे पर्यावरणाचे संरक्षणही होते, तसेच स्थानिकांचे सक्षमीकरण व त्यांना उपजीविकेची साधने पुरवणेही शक्य होते.

एनर्जी स्वराजला प्रोत्साहन देण्यासाठी प्राध्यापक सोळंकी यांनी गांधी ग्लोबल सोलर यात्रा सुरू केली आहे. २५ डिसेंबर २०१८ रोजी साबरमती आश्रमापासून ही यात्रा सुरू झाली आहे. प्रा. सोळंकी म्हणाले, “माझी यात्रा सुरू करण्यासाठी साबरमती आश्रमाहून अधिक चांगले स्थळ असूच शकत नव्हते. गांधीजींनी ‘स्वयंपूर्णता’ व ‘अहिंसा’ ही तत्त्वे शिकवत याच आश्रमात त्यांचे संपूर्ण आयुष्य घालवले. मी या आश्रमाला यापूर्वीही भेट दिली आहे पण यावेळी मला येथून जशी दैवी शक्ती प्राप्त झाल्याची भावना आली तशी त्यावेळी कधी आली नव्हती.

साबरमती आश्रमात दोन दिवस घालवल्यानंतर त्यांनी त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा आग्नेय आशियातील देशांत केला. इंडोनेशिया, मलेशिया आणि म्यानमार या देशांना त्यांनी भेटी दिल्या. सियाह कौला विद्यापीठाला दिलेल्या पहिल्या भेटीत त्यांनी सर्वांना वीज मिळेल याची काळजी घेऊन हवामान बदलाला कसे तोंड द्यावे यावर विद्यार्थ्यांपुढे मार्गदर्शनपर भाषण केले. सोलर स्टडी लॅम्प कसा जोडायचा याचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रत्यक्ष प्रशिक्षण त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. इंडोनेशियाला भेट दिल्यानंतर त्यांनी मलेशियातील मलेशिया तेरेनगानु विद्यापीठातील विद्यार्थ्यांपुढेही भाषण दिले.

क्वालालंपूरच्या रस्त्यांवरून चालताना टिमोथी बेरीचे एक प्रसिद्ध उद्धृत ‘तुम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा पूर्णपणे अपयशी ठरणे कठीण असते’ वाचल्याचे प्रा. सोळंकी यांनी नमूद केले. हे उद्धृत त्यांच्यासाठी प्रेरणेचा स्रोत झाले आणि आता एनर्जी स्वराजचा संदेश जगभर पोहोचवण्याचा निश्चय त्यांनी केला आहे. म्यानमारला दिलेली भेट त्यांच्यासाठी प्रेरणेचा आणखी एक स्रोत ठरली. येथील १०० कुटुंबांपैकी ९५ गांधीजींच्या तत्त्वावर ठाम विश्वास ठेवणारी आहेत असे त्यांना दिसले. म्यानमारमधील विद्युतीकरणाची परिस्थिती बघता प्रा. सोळंकी म्हणाले, “म्यानमारमधील विजेपासून वंचित असलेल्या पण एकमेकांशी दृढ संबंध असलेल्या समुदायांसाठी ऑफ-ग्रिड सौरऊर्जा तंत्रज्ञान हा सर्वोत्तम उपाय आहे. या समुदायांनी तंत्रज्ञानाची एक पिढी ओलांडून वायर्स ते वायरलेस असा प्रवास केल्यास त्यांच्यासाठी ते उत्तम ठरेल.” त्यांचा संपूर्ण दौरा २७ डिसेंबर २०१८ ते २ जानेवारी २०१९ या काळात झाला.

टॅग्स :ऊर्जा बजेट 2018वीज