येत्या पावसाळ्यात तुंबणार नाही गांधी मार्केट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:14 AM2021-01-13T04:14:37+5:302021-01-13T04:14:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - प्रत्येक पावसाळ्यात हमखास तुंबणारे रस्ते पूरमुक्त करण्यासाठी महापालिकेने आराखडा तयार केला आहे. त्यानुसार माटुंगा ...

Gandhi Market will not be flooded in the coming monsoon | येत्या पावसाळ्यात तुंबणार नाही गांधी मार्केट

येत्या पावसाळ्यात तुंबणार नाही गांधी मार्केट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - प्रत्येक पावसाळ्यात हमखास तुंबणारे रस्ते पूरमुक्त करण्यासाठी महापालिकेने आराखडा तयार केला आहे. त्यानुसार माटुंगा येथील गांधी मार्केटमध्ये दरवर्षी तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा जलद गतीने होण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. यासाठी तब्बल १६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पुढच्या महिन्यात या कामाला सुरुवात होऊन पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणार आहे.

सखल भागात असलेल्या गांधी मार्केटमध्ये प्रत्येक पावसाळ्यात तीन फूट पाणी भरते. २००५ मध्ये मुंबईत आलेल्या पूरपरिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर चितळे समितीने माटुंगा परिसरात पाण्याचा निचरा होण्यासाठी माहुल पंपिंग स्टेशन उभारण्याची शिफारस केली होती. मात्र, या पंपिंग स्टेशनचे काम अद्याप कागदावरच असल्याने गांधी मार्केटचा प्रश्न ‘जैसे थे’च आहे. त्यामुळे पंपिंग स्टेशन तयार होईपर्यंत गांधी मार्केटची सुटका करण्यासाठी पालिकेने दुसरे नियोजन केले आहे.

असे असेल काम...

जे.वाय. मार्ग, भारतनगर रेल्वे कल्वर्ट, अवंती अपार्टमेंट कल्वर्ट आणि षण्मुखानंद हॉल कल्वर्ट येथील पर्जन्य वाहिन्यांवर फ्लड गेट उभारणे, गांधी मार्केट ते भारतनगर कल्वर्टपर्यंत ९०० मि.मी. व्यासाची पर्जन्य वाहिनी टाकण्यात येणार आहे. गांधी मार्केट येथील पर्जन्य वाहिनी चार दिशेने जात असल्याने भरतीचे पाणी आत शिरू नये यासाठी या मार्गांवर गेट बसविण्यात येणार आहेत. जेणेकरून गांधी मार्केट परिसरात भरलेले पावसाचेे पाणी दुसऱ्या मार्गाने गेटबाहेर काढले जाईल, तसेच पावसाचे पाणी उपसण्यासाठी १३ पंप बसविण्यात येतील.

गांधी मार्केटचे महत्त्व...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर असलेले गांधी मार्केट सखल भागात आहे. शहर आणि पूर्व उपनगराला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते, तसेच एलफिस्टन रोड, लोअर परेल, फोर्ट, नरिमन पॉइंट येथील व्यावसायिक संकुलांना पूर्व उपनगराशी जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे पावसाळ्यात या मार्गावर पाणी तुंबण्याचा फटका वाहतुकीला बसतो.

Web Title: Gandhi Market will not be flooded in the coming monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.