Join us

गांधीजींच्या चित्रपटांचे केले जाणार जतन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 6:13 AM

पीआयक्यूएल प्रक्रियेचा वापर करत स्कॅन चित्रपटांच्या डिजिटल डेटाचे दीर्घकालीन जतन करण्यासाठीचा भारतातील अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे. सुरुवातीला या प्रकल्पासाठी दोन चित्रपट निवडले गेले आहेत.

मुंबई : गांधी फिल्म्स फाउंडेशनचे चित्रपट पीआयक्यूएल तंत्रज्ञानाचा वापर करून ५०० वर्षांहूनही अधिक काळासाठी जतन करून ठेवण्यासाठी सहकार्य करार करत असल्याची घोषणा गांधी फिल्म्स फाउंडेशन (जीएफएफ) आणि पीआयक्यूएल, नॉर्वेने नुकतेच केली. गांधी फिल्म्स फाउंडेशनचे नितीन पोतदार यांनी मुंबई येथून तर पीआयक्यूएल, एएसचे व्यवस्थापकीय संचालक रूने जर्केस्ट्रँड यांनी नॉर्वे ड्रामेन येथून ही घोषणा केली.

पीआयक्यूएल प्रक्रियेचा वापर करत स्कॅन चित्रपटांच्या डिजिटल डेटाचे दीर्घकालीन जतन करण्यासाठीचा भारतातील अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे. सुरुवातीला या प्रकल्पासाठी दोन चित्रपट निवडले गेले आहेत. पहिला चित्रपट हा १४ मिनिटांचा लघुपट असून तो लंडन येथे १९३० ते १९३२ दरम्यान झालेल्या गोलमेज परिषदेवर आधारित आहे. 

या लघुपटामध्ये गांधीजींच्या स्वित्झर्लंड आणि इटली येथील दौऱ्याचाही समावेश आहे. या लघुपटातील बहुतेक श्राव्य कॉन्टेंट हे इंग्रजीमध्ये आहे. दुसरा हा ११ मिनिटांचा लघुपट असून तो गुजरातमधील दांडी यात्रेवर आहे. 

गांधीजींच्या चित्रपटांमध्ये त्यांची अमूल्य अशी शिकवण आहे. त्यांचे जतन आपल्या भावी पिढ्यांसाठी करणे खूप गरजेचे आहे. जर ते केले नाही तर आपण देशाप्रति असलेल्या आपल्या कर्तव्यामध्ये आम्ही कसूर करू.- नितीन पोतदार, अध्यक्ष, गांधी फिल्म्स फाउंडेशन, मुंबई पीआयक्यूएल प्रक्रिया ही कृष्णधवल चित्रपटांवर डिजिटल डेटा लिहिण्याची न्यू पेटंटेड प्रोसेस असून तिला तब्बल ५०० हूनही अधिक वर्षांचे आयुष्य आहे. जर मुद्रित चित्रपट नॉर्वे येथील पीआयक्यूएलच्या आर्क्टिक वर्ल्ड अर्काईव्ह (एडब्ल्यूए) मध्ये उप - शून्य तापमानावर साठवला गेला तर हे आयुष्य आणखीही पुढे वाढू शकते.गांधी फिल्म्स फाउंडेशनचे विश्वस्त उज्ज्वल निरगुडकर यांनी या सहकार्य करारासाठी पुढाकार घेतला. दुसरे विश्वस्त सुभाष जयकर यांनी या प्रकल्पासाठी दोन चित्रपटांची निवड केली. रमेश बजाज हे भारतातील पीआयक्यूएल असोसिएट असून त्यांनी या प्रकल्पासाठी नॉर्वे पीआयक्यूएलबरोबर संयोजन केले आहे.

टॅग्स :महात्मा गांधी