Join us  

गांधीजींच्या आध्यात्मिक गुरूंचा नाट्यशोध..!

By admin | Published: May 05, 2017 6:40 AM

महात्मा गांधी यांनी त्यांच्या राजकीय जीवनात गुरुस्थानी मानलेल्या व्यक्तींचे दाखले इतिहासात आहेत; मात्र त्यांना आध्यात्मिक गुरूसुद्धा

राज चिंचणकर / मुंबईमहात्मा गांधी यांनी त्यांच्या राजकीय जीवनात गुरुस्थानी मानलेल्या व्यक्तींचे दाखले इतिहासात आहेत; मात्र त्यांना आध्यात्मिक गुरूसुद्धा होते, हे एका नाट्यकृतीतून नव्याने उलगडले आहे. ‘युगपुरुष - महात्म्यांचे महात्मा’ या नाटकाने हे पहिल्यांदाच समोर आणले आहे. हे नाटक प्रथम गुजराती भाषेत सादर झाले आणि अल्पावधीतच मराठी, इंग्रजी, तामिळ, बंगाली आदी भाषांतूनही हे नाटक रंगभूमीवर आले. विशेष म्हणजे, कलाकारांच्या एकूण सहा संचात हे नाटक सादर होत असून महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिण भारतात या नाटकाचे प्रयोग झाले आहेत.हे नाटक म्हणजे केवळ एक कलाकृती नसून, ते एक ‘मिशन’ झाले आहे. जैन तत्त्ववेत्ते श्रीमद् राजचंद्रजी हे महात्मा गांधी यांचे आध्यात्मिक गुरू होते असे स्पष्ट करत, या दोघांमधल्या अनोख्या भावबंधाचे पैलू हे नाटक उलगडते. गुजरातच्या धरमपूर येथील ‘श्रीमद् राजचंद्र मिशन’ या संस्थेने हे नाटक ५ महिन्यांपूर्वी रंगभूमीवर आणले आणि आतापर्यंत या नाटकाचे चारशेहून अधिक प्रयोग पार पडले आहेत. श्रीमद् राजचंद्रजी यांच्या १५०व्या जन्मवर्षाचे औचित्य साधून या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. या नाटकाचे लेखन उत्तम गाडा यांनी केले आहे. राजेश जोशी यांनी ते दिग्दर्शित केले आहे. या मूळ गुजराती नाटकाचे मराठी भाषांतर अंबर हडप यांनी केले असून अमलेंदू जोशी, श्रेयस राजे, देवेश काळे या कलावंतांच्या प्रमुख भूमिका यात आहेत.सामाजिक कार्यासाठी उत्पन्नाचा विनियोग...या नाटकातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विनियोग दक्षिण गुजरातमधल्या आदिवासी भागात उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयासाठी करण्यात येणार आहे.  त्यादृष्टीने या नाटकाचे प्रयोग समाजातल्या दानशूर व्यक्ती किंवा संस्थांनी प्रायोजित करून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीमद् राजचंद्र मिशन, धरमपूर या संस्थेतर्फे करण्यात आले आहे.