लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सत्ताधारी भाजपची महायुतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीचा विजय होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नका, असे आवाहन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना तुषार गांधी यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली. महाविकास आघाडीत सहभागी न होता स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याच्या आंबेडकरांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले की, जे चूक आहे त्याला चूकच म्हणायची आता स्पष्ट वेळ आली आहे. यापूर्वी जी चूक झाली, तीच पुन्हा होऊ शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान जपायचे असेल तर ही शेवटची संधी आहे. किमान यावेळी त्यांनी स्वतःचा फायदा न बघता, राष्ट्राचे हित बघण्याची गरज होती, पण त्यांनी ते केले नाही म्हणून ते टीकेस पात्र आहेत, असे ते म्हणाले.
त्यांच्या विचारात स्पष्टता नाही : प्रकाश आंबेडकर
मुंबई : तुषार गांधींनी केलेले विधान अत्यंत चुकीचे आहे. कोणताही आधार नसलेले आणि वंचित बहुजनांच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारे त्यांचे विधान आहे. लोकशाही आणि स्वतंत्र राजकीय नेतृत्वासाठीच्या प्रयत्नांना, तसेच वर्ग, जात- धर्माच्या पलीकडे जाऊन सुरू असलेल्या सर्वसमावेशक राजकारणाला नाकारणारे आहे, असे सडेतोड प्रत्युत्तर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे. तुमच्या आजोबांची ब्रिटिशांविरुद्धची चळवळ सर्वसमावेशक होती, पण तुमचे विचार आणि राजकारणामध्ये तशी स्पष्टता दिसत नाही. महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीसोबत कसा व्यवहार केला हे तुम्हाला माहिती नाही का? त्यांचे राजकारण किती अलिप्त आहे हे तुम्हाला माहीत नाही का? महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झालेली तडजोड तुम्हाला माहिती नाही का?, असा सवालही आंबेडकरांनी तुषार गांधी यांना विचारला.