Join us

गणेश आगमन सोहळ्यांची धूम

By admin | Published: September 12, 2015 3:55 AM

ढोल-ताशांचा गजर, डीजे, ध्वजपथक, पारंपरिक वेशभूषा केलेली तरुण मंडळी, फुलांची उधळण, स्वागतासाठी मोठे हार, किमान चार ते पाच तास चालणारी बाप्पाची मिरवणूक

मुंबई : ढोल-ताशांचा गजर, डीजे, ध्वजपथक, पारंपरिक वेशभूषा केलेली तरुण मंडळी, फुलांची उधळण, स्वागतासाठी मोठे हार, किमान चार ते पाच तास चालणारी बाप्पाची मिरवणूक डोळे दिपवून टाकणारी असते. दोन-एक वर्षांपूर्वीपर्यंत विसर्जन मिरवणुकीला होणारा थाट आता बाप्पाच्या आगमनालाही दिसून येत आहे. कालांतराने प्रत्येक गोष्टीत होणाऱ्या बदलांप्रमाणे गणेशोत्सवाचे स्वरूपही बदलत आहे. काही वर्षांपूर्वी उंच गणेशमूर्तींची स्पर्धा सार्वजनिक मंडळांमध्ये रंगताना दिसत होती. या वेळी अगदी १० फुटांपासून ते २५ फुटांपर्यंतच्या उंचच्या उंच गणेशमूर्ती बनवण्याची स्पर्धा सुरू झाली होती. त्यातही गणेशाची रूपे बदलत गेली. म्हणजे गणेशमूर्ती या शिव, राम, कृष्ण अशा अवतार रूपांमध्ये दिसायला लागल्या. विविध रूपांतील गणेशमूर्ती या भक्तांना आकर्षित करत असत. त्यात गणेश मंडळांची देखाव्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली. कोणत्या गल्लीतल्या बाप्पाचा देखावा चांगला आहे, त्यानुसार त्या मंडळाबाहेर भक्तांच्या रांगाच्या रांगा लागायच्या. या काळात गणेशोत्सवात विविध सामाजिक विषयांच्या बरोबरच प्रेक्षणीय स्थळे देखाव्यात उभे करण्याचा ट्रेण्ड आला. चलतचित्रांचा ट्रेण्ड त्या काळात मोठ्या प्रमाणात दिसून यायचा. ज्या मंडळांचा देखावा अधिक सुबक, वेगळा असायचा तिथे भक्तांच्या रांगा रात्री उशिरापर्यंत असायच्या. यातूनच मंडळांना प्रसिद्धी मिळत गेली. पुढच्या काही वर्षांत ‘श्रीं’चा ‘राजा’, ‘महाराजा’, ‘विघ्नहर्ता’ असे नामकरण व्हायला लागले. भक्तांचा लाडक्या बाप्पाला ‘राजा’चा बहुमान मिळायला लागला. यानंतर बाप्पाची मूर्ती तयार करायला सुरुवात करण्यासाठी ‘पाद्यपूजन सोहळ्या’चे आयोजन होऊ लागले. आता आगमन सोहळ्याचेही रूप बदलत चालले आहे. (प्रतिनिधी)