मुंबई - लाडक्या गणपती बाप्पाचं घराघरात, सार्वजनिक मंडळांमध्ये ढोलताशाच्या गजरात जल्लोषात आगमन झालेले आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, या जयघोषात भक्तांनी आपल्या गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. गणेशोत्सव मंडळांनी वाद्यांच्या गजरात काढलेल्या गणेशमूर्तींच्या मिरवणुका व फुललेल्या बाजारपेठा यामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे. लालबागच्या राजा, गणेश गल्लीचा राजा आणि सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ-मोठ्या रांगा लागल्या आहेत.
गणेशपूजनासाठी मध्यान्ह काळ योग्य
आजच्या गणेशपूजनासाठी मध्यान्ह काळ हा योग्य आहे. सकाळी 11 वाजून 21 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 48 मिनिटांपर्यंत मध्यान्ह काळ आहे. परंतु, जर कोणाला या वेळेत शक्य नसेल तर त्यांनी पहाटे चार वाजल्यापासून संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत म्हणजे 6.42 वाजेपर्यंत पूजन करण्यास हरकत नाही. ज्येष्ठ गौरी अनुराधा नक्षत्रात येतात आणि ज्येष्ठा नक्षत्रात त्यांचे पूजन केले जाते. तर मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते. या वर्षी शनिवारी 15 सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवस अनुराधा नक्षत्र आहे. रविवारी संपूर्ण दिवस ज्येष्ठा नक्षत्र आहे, त्यामुळे पूर्ण दिवस गौरी पूजनासाठी अनुकूल आहे, अशी माहिती पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी दिली.
मुंबईत ६ हजार सार्वजनिक गणपतीमुंबईत ६ हजार ४५५ सार्वजनिक ठिकाणी, १ लाख ५५ हजार ४१४ ठिकाणी घरगुती गणपती तर, ११ हजार ८१३ ठिकाणी गौरीची स्थापना होईल. गणेशोत्सव व मुस्लीम बांधवांचा मोहरम शांततेत पार पडावा यासाठी या कालावधीत मुंबईत ५० हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज झाला आहे. तसेच ५ हजार सीसीटीव्ही शहरावर नजर ठेवणार आहेत.
मुंबई पोलीस दलाच्या मदतीला केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या तुकड्या तैनात आहेत. राज्य दहशतवाद विरोधी विभाग (एटीएस), बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस),दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, सशस्त्र पोलीस दल, मुंबई वाहतूक विभाग, होमगार्ड आणि नागरी संरक्षण दलही तैनात ठेवण्यात आले आहे.