Join us

लालबाग-परळमध्ये गणेशभक्तांची रीघ; अनंत चतुर्दशीला उरला एक दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 1:22 AM

बाप्पाला डोळेभरून पाहण्यासाठी घाई

मुंबई : शहर उपनगरात गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतोय. अनंत चतुदर्शीला अवघा एक दिवस उरला असताना लालबाग-परळमध्ये आता बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली आहे. त्यात मंगळवारी सार्वजनिक सुटी आणि पावसाने उसंत घेतल्याने भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.

मुंबईचा मानाचा गणपती म्हणून ओळख असणाऱ्या सिद्धिविनायक मंदिरांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक लांबच्या लांब रांगा लावत आहेत. विघ्नहर्त्याचे दर्शन घेण्यासाठी तसेच जागृतीपर संदेश देणारे देखावे पाहण्यासाठी भक्तांची शहर उपनगरात गर्दी होऊ लागली आहे. रात्रीच्या वेळी भक्तमंडळी उत्सवाचा आनंद घेत आहेत. विशेषत: गणेशगल्लीचा गणपती, लालबागचा राजा, रंगारी बदक चाळ, चिंचपोकळीचा चिंतामणी, परळचा नरेपार्कचा राजा, तेजुकाया, खेतवाडीच्या गल्ल्यांमधील हे गणपती एकमेकांपासून हाकेच्या अंतरावर असल्याने दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी करतात.

गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशी पर्यंतच्या काळात सर्वत्र उत्साही वातावरण अनुभवायला मिळते. चौकाचौकात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. काही गणेशोत्सव मंडळांनी समाज जागृती करणारे देखावे सादर करण्यात आले आहेत. यामुळे गणेश दर्शनाची भक्तांना ओढ लागली आहे. रात्रीच्यावेळी रस्ते गर्दीने फुलत आहेत. तरुण मुले-मुली आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत गणेशदर्शनाचा लाभ घेताना दिसत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे विविध विधायक उपक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. विविध स्पर्धा, कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे शहर आणि परिसराला खºया अर्थाने उत्सवाचे स्वरुप आले आहे. भव्य देखावे, विद्युत रोषणाई, आकर्षक गणेशाचे रुप डोळ्यात साठविण्यासाठी दर्शन घेत आहेत.देखाव्यांचे आकर्षणगणेशमूर्ती पाहण्याबरोबरच भक्तांना देखाव्यांचे खास आकर्षण असते. यामुळे शहरातील विविध मंडळांनी अनेक देखावे साकारले आहेत. यामध्ये पंढरपूरची वारी, राम मंदिर, पशुपतीनाथ मंदिर, पंढरपूर दर्शन, पाणी वाचवा, वृक्षारोपण, दुष्काळाची परिस्थिती, पावसासाठी साकडे असे विविध प्रसंग दर्शविणारे देखावे तयार करण्यात आले आहेत. यामुळे देखाव्यांचे आकर्षण भक्तांमध्ये अधिकाधिक दिसतेय.

टॅग्स :गणेश मंडळ 2019