वैभव गायकरपनवेल : गणपती बाप्पांचे मंगळवारी आगमन होत आहे. त्यात शनिवार, रविवारी सुटी असल्याने अनेक कोकणवासीय गणेशोत्सवाला गावी निघाले आहेत. त्यामुळे शनिवारी शीव-पनवेल, जुना मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा या तिन्ही महामार्गांवर वाहतूककोंडी झाली आहे. खारघर टोल नाका, कळंबोली सर्कल, पळस्पे फाटा येथे गर्दी पाहावयास मिळाली. रेल्वेसह एसटीच्या विशेष गाड्या कोकणात जात आहेत. या व्यतिरिक्त मोठ्या संख्येने चाकरमानी स्वत:चे वाहन घेऊन गावाकडे जात असतात. शीव-पनवेल महामार्गावरून पुढे घाटमाथ्यावर पुणे मार्गे जावे लागत असल्याने शीव-पनवेल महामार्गावर वाहनांची वर्दळ होती.
पनवेलमध्ये गर्दीपनवेल येथे खरेदीसाठी नागरिकांनी शनिवारी मोठी गर्दी केली होती. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पाटील स्वतः वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक कर्मचाऱ्यांसह रस्त्यावर उतरले होते. यावेळी शहरात बेशिस्त वाहन पार्किंगमुळे काही ठिकाणी वाहतूककोंडी झाल्याचे पाहावयास मिळाले. कळंबोली सर्कल, मॅकडॉनल्डजवळही मोठ्या प्रमाणात खासगी बस पाहावयास मिळाल्या. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठिकठिकाणी पोलिस तैनात होते. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहतुकीला अडथळा होऊ नये व वाहतूककोंडी होऊ नये म्हणून ५ सप्टेंबरपासून २९ सप्टेंबरपर्यंत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर सर्व अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे.
गणेशोत्सव सणाला चाकरमानी गणेशभक्त हे मुंबईतून कोकणात जाण्यास निघाले आहेत. एकीकडे मुंबई-गोवा महामार्गाचे असलेले अपूर्ण काम आणि दुसरीकडे वाहनांची वाढलेली संख्या यामुळे गणेशभक्तांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्न करीत आहेत; मात्र चाकरमानी गणेशभक्तांना वाहतूककोंडीतूनच प्रवास करावा लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी सकाळच्या सत्रात वाहतूक सुरळीत सुरू होती; मात्र दुपारनंतर चाकरमानी हे आपल्या खासगी वाहनाने गावी जाण्यास निघाले आहेत. माणगाव येथे दोन-तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लावून वाहतूककोंडी झाली आहे. माणगाव बाजारपेठेतून हा महामार्ग जात असल्याने खरेदीसाठी नागरिक बाजारात आले आहेत; तसेच गणेशोत्सव सणाला जाणाऱ्या गणेशभक्तांची वाहनेही वाढलेली आहेत. माणगावमधून निजामपूर आणि श्रीवर्धनकडे जाणारे दोन बाह्य रस्ते असल्याने वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे येथील वाहतूक संथगतीने सुरू होती.