मुंबई - शहरातील तरुणांना शेतीकडे वळविण्याचा संदेश देण्यासाठी अनोखा देखावा कांदिवलीतील सह्यादी डी २ सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा सादर केला आहे. कांदिवली पश्चिम येथील सह्यादी नगर मध्ये असणाऱ्या या गणेश उत्सव मंडळातर्फे सातत्याने सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण विषयावर आधारित सजावट देखावा केला जातो त्यातून सामाजिक भान राखले जाते.
यंदा मंडळाने शहरातील तरुणांना शेतीकडे वळविण्याचा जनजागृती संदेश देणारा 'आता उजाडेल! अर्थात शेती ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे हे सांगणारा देखावा उभारला आहे. शहरातील सुखसोईंनी सरावलेल्या तरुणांना गावाकडची माणसं, शेती, तिथल्या समस्या त्यावरचे उपाय आपली जबाबदारी आणि कर्तव्य याचा विसर पडत चालला आहे पण आता विविध योजनांच्या माध्यमातून आपला पारंपारिक व्यवसाय असणारी शेती या नव्या विचारांच्या तरुणाईमुळे पुन्हा बहरु शकते हे या मंडळाने गणेशोत्सवात सांगण्याचा प्रयास केला आहे सांगली, सातारा, कोल्हापूर येथे आलेल्या महापुरात उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचा निश्चय मंडळाने केला आहे. या देखाव्याची संकल्पना घनश्याम देटके यांची असून संहिता लेखन साहित्यिक विनोद पितळे यांचे असून आवाज राजेश शिरभाते ,सीमा कोंडे ,आदित्य संभूस निलेश काचोळे यांचा आहे. सजावटीचे दिग्दर्शन गीतांजली कदम यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांनी हातभार लावून केला आहे.
तसेच सजावटीसाठी जास्त पैसे खर्च न करता टाकाऊ पासून टिकाऊ साहित्य वापरण्यात आले आहे असे मंडळाचे सचिव दिलीप अनपट व खजिनदार विश्वजित मोरे यांनी सांगितले व सजावटीसाठी जुने वृत्तपत्र तसेच जुन्या वस्तू वापरण्यात आले आहे असे शहाजी सोळस्कर व निलेश भिलारे यांनी सांगितलं या मंडळला आपल्या वैशिष्टपूर्ण साहित्यिक सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक कला पर्यावरण ग्रंथजोपासना आरोग्य जेष्ठ नागरिकांसाठी उपक्रम आदी कार्याबद्दल विविध पुरस्कारही मिळालेले आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष रोहिदास चिकणे यांनी दिली.