मुंबई - सध्या शहरामध्ये गणेशोत्सावाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. लाडक्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांनी चांगलीच गर्दी केली आहे. अंधेरी पूर्वेकडील श्री साई श्रद्धा सेवा संस्थेच्यावतीने गेल्या 12 वर्षापासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. गुंदवलीचा मोरया म्हणून या गणपतीची ओळख आहे.
यंदा गुंदवलीच्या मोरयाला गणेश भक्ताकडून चांदीचा हात दान करण्यात आला आहे. गुंदवलीच्या मोरयाकडे मागितलेला नवस पूर्ण झाल्याने बाप्पाला ही भेट दिली मात्र या गणेशभक्ताने नाव सांगू नये अशी अट घातल्याची माहिती मंडळाचे पदाधिकारी संतोष सावंत यांनी सांगितली आहे. दरवर्षी प्रमाणे गणेशोत्सवाचा उत्साह यंदाही कायम आहे.
या मंडळाकडून सण साजरे करतानाच सामाजिक भान जपण्याचाही प्रयत्न केला जातो. सांगली, सातारा, कोल्हापूर याठिकाणी आलेल्या महापुरामुळे अनेक लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी जीवनावश्यक वस्तू पाठविण्याचे कार्य श्री साई श्रद्धा सेवा संस्थेच्यावतीने करण्यात आले. तसेच वर्षभर अनेक गरजूंना मदत म्हणून मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून आदिवासी पाड्यावर विविध उपक्रम राबविण्यात येतात.