खवा, मिठाई, पनीर, तूप शुद्ध आहेत ना? खबरदार भेसळ कराल तर..., गणेशोत्सवावर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 10:46 AM2024-09-03T10:46:39+5:302024-09-03T10:49:38+5:30
Ganesh Mahotsav 2024: गणेशोत्सवाच्या काळात भंडारा किंवा प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांत भेसळ होऊ नये म्हणून अन्न व औषध प्रशासन सज्ज झाले आहे. राज्यात उत्सवाच्या काळात खवा, मिठाई, पनीर, दही, तूप, खाद्य तेल, फरसाण, रवा, आटा, बेसन, मैदा, सुकामेवा या पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश सर्व विभागीय सह आयुक्तांना देण्यात आले आहेत.
मुंबई - गणेशोत्सवाच्या काळात भंडारा किंवा प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांत भेसळ होऊ नये म्हणून अन्न व औषध प्रशासन सज्ज झाले आहे. राज्यात उत्सवाच्या काळात खवा, मिठाई, पनीर, दही, तूप, खाद्य तेल, फरसाण, रवा, आटा, बेसन, मैदा, सुकामेवा या पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश सर्व विभागीय सह आयुक्तांना देण्यात आले आहेत.
सणासुदीत अन्न विषबाधेसारखी कोणतीही घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी, यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत. सणासुदीच्या काळतील भेसळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान विशेष कारवाई मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
गणेशोत्सव, दसरा, दिवाळी आणि नाताळ या सणांच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविली जाणार आहे. त्यानुसार, दूध, दुग्धजन्य पदार्थ म्हणजे खवा, मिठाईच्या उत्पादनावर आणि विक्रीवर नजर ठेवली जाणार आहे.
मिठाईचे उत्पादक विक्रेते व खवा-मावाचे उत्पादक विक्रेते यांच्या सखोल तपासण्या होतील. संशयास्पद अन्नपदार्थांचे नमुने घेऊन आवश्यक ठिकाणी धाडी, जप्तीची कारवाई केली जाईल.
खवा, मावा यांच्या पुरवठादारावर लक्ष ठेवले जाईल. खवा, मावा यांची वाहतूक करणारी वाहने म्हणजेच प्रामुख्याने खासगी बस, ट्रक यांच्यावर लक्ष ठेवले जाईल. साठवणूक आणि वाहतूक करण्या बाबतचे आदेश देण्यात आले आहेत.
फूड सेफ्टी ऑन व्हील्स याचा वापर करून अन्न नमुन्यांची चाचणी केली जाईल. तसेच अन्न व्यावसायिकांना त्यासंर्भात प्रशिक्षण दिले जाईल.
प्रत्येक सहायक आयुक्तांकडून मिठाई उत्पादक व विक्रेते यांची बैठक घेतली जाईल व योग्य ते निर्देश दिले जातील.
या मोहिमेबाबत ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.