Join us  

मुंबईमध्ये १५ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 9:56 AM

लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी मुंबापुरी सजली असून गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात १४ हजार ९३२ पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी मुंबापुरी सजली असून गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी मुंबईपोलिसांनी शहरात १४ हजार ९३२ पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला आहे. लालबागच्या राजासह मोठ्या गणेश मंडळाच्या आणि महत्त्वाच्या ठिकाणी एसआरपीएफ प्लाटून, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट, तसेच होमगार्डस् अशा विशेष पोलीस बंदोबस्ताचे आयोजन पोलिसांनी केले आहे. 

७ ते १७ सप्टेंबर या काळात दीड दिवस, पाच दिवस, गौरी विसर्जन, सात दिवसांचे गणेश मूर्ती विसर्जन आणि अनंत चतुर्दशी असा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या नेतृत्वात सहआयुक्त, अपर आयुक्त, ३२ पोलीस उपायुक्त, ४५ सहायक पोलीसआयुक्त यांच्यासह २,४३५ पोलीस अधिकारी आणि १२ हजार ४२० पोलिस अंमलदार शहरात तैनात राहणार आहेत. सोबतच शहरातील सीसीटीव्हींद्वारे पोलीस सर्व हालचालींवर नजर ठेवणार आहेत.

पोलिसांनी मुंबईच्या प्रवेशद्वारांसह महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करत संशयास्पद वस्तू, व्यक्ती, वाहने यांची तपासणी सुरू केली आहे. 

गर्दीच्या ठिकाणी सहकार्य करा-

गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत आकर्षक सजावटी, देखाव्यासह विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमदेखील राबविले जातात. सार्वजनिक मंडळांना भाविक वर्ग मोठ्या प्रमाणात भेटी देतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी संयम दाखवून पोलिसांना सहकार्य करावे. 

बेवारस, संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी, तसेच सर्व नागरिकांनी नियमांचे भान ठेवून गणेशोत्सव उत्साहाने व जल्लोषात साजरा करावा. नागरिकांनी तात्काळ पोलिस मदतीसाठी पोलीस हेल्पलाइन १००, ११२ येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :गणेशोत्सव 2024मुंबईपोलिसगणेश चतुर्थी २०२४