मुंबईत ९३ हजार गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन; नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 09:34 AM2024-09-19T09:34:53+5:302024-09-19T09:36:52+5:30
महापालिकेकडून यंदा २०० हून अधिक कृत्रिम तलाव तयार करण्यात आल्यामुळे त्यातील गणेशमूर्ती विसर्जनाच्या संख्येत यंदा मागील वर्षीपेक्षा मोठी वाढ झाल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महापालिकेकडून यंदा २०० हून अधिक कृत्रिम तलाव तयार करण्यात आल्यामुळे त्यातील गणेशमूर्ती विसर्जनाच्या संख्येत यंदा मागील वर्षीपेक्षा मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. यंदा १८ सप्टेंबरपर्यंत झालेल्या एकूण विसर्जनापैकी तब्बल ९३ हजार ५७० गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्यात आले.
गेल्यावर्षी १९४ कृत्रिम तलाव होते व ७६ हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन झाले होते. त्यामुळे पालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाच्या आवाहनाला मुंबईकरांनी यंदाही चांगला प्रतिसाद दिला. मुंबईकरांची पर्यावरणाविषयीची सजगता आणि जागरूकता दाखवून दिली.
प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या गणेशमूर्ती पाण्यात लवकर विरघळत नसून समुद्र जीवाला धोका वाढतो. त्यामुळे पीओपीच्या गणेशमूर्तींऐवजी शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा आणि कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करा, असे आवाहन पालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व सर्व भक्तांना केले होते. गेल्या अकरा वर्षांत कृत्रिम तलावातील गणेश विसर्जनाच्या प्रमाणात तब्बल ३७१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
...म्हणून कृत्रिम तलावांतील विसर्जन वाढले
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी पालिका प्रशासनाने मूर्तिकारांना शाडूची मातीही पुरवली. मात्र, तरीही अनेक ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती आणल्या जातात. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती नैसर्गिक जलस्त्रोतात विसर्जित केल्यास जल प्रदूषण होते. कृत्रिम तलाव घराच्या आसपासच्या परिसरात असल्यामुळे घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी सोयीचे ठरत आहे. त्यामुळे कृत्रिम तलावांमध्ये मूर्तींचे विसर्जन करण्याचे प्रमाणही यंदा वाढले आहे. पर्यावरणाबाबत मुंबईकरांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण होत असल्याचे या गणेशोत्सवात दिसून आले.
दिंडोशीत बैलगाडीतून विसर्जन मिरवणूक-
दिंडोशी येथील न्यू म्हाडा श्री समर्थ फेडरेशन बिल्डिंग नंबर २, ३ या गृहनिर्माण सोसायटीने बैलगाडीतून गणरायाची वाजत गाजत विसर्जन मिरवणूक काढली. त्यानंतर सोसायटीतील उद्यानातील कृत्रिम तलावात विसर्जन करत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
महिलांनी पंढरपूर वारी सादर केली. तसेच महिला अत्याचाराविरोधात पथनाट्य सादर केले, अशी माहिती चित्रपट कला दिग्दर्शक तसेच मंडळाचे अध्यक्ष सुनील थळे यांनी दिली. थळे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते.