Ganesh Mahotsav: बाप्पाच्या स्वागतासाठी अवघी मुंबापुरी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 08:41 AM2022-08-31T08:41:26+5:302022-08-31T08:42:32+5:30
Ganesh Mahotsav: आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे बुधवारी आगमन होत आहे. मुंबईकरांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी महापालिका देखील गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज आहे.
मुंबई : आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे बुधवारी आगमन होत आहे. मुंबईकरांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी महापालिका देखील गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज आहे. आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार विविध स्तरीय कार्यवाही करण्यात येत असून, गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबापुरी सज्ज झालेली आहे.
श्रीगणेशाची मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांना मंडप परवानगी देण्याची प्रक्रिया काही महिन्यांपूर्वीच करण्यात आली आहे. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन पद्धतीने मंडप परवानगी देण्याची अर्ज प्रक्रिया २६ ऑगस्टपर्यंत राबविण्यात आली आहे. या अंतर्गत ३ हजार ४८७ अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली.
अशी आहे व्यवस्था
महापालिकेचे १० हजार अधिकारी व कर्मचारी कार्यतत्पर
महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या स्तरावर १८८ नियंत्रण कक्ष
विसर्जनस्थळी
७८६ जीवरक्षक तैनात
नैसर्गिक विसर्जन स्थळी आवश्यक तेथे ४५ मोटार बोट व ३९ जर्मन तराफा व्यवस्था
प्रमुख विसर्जन स्थळी
२११ स्वागत कक्ष
व्यवस्थेसाठी ३ हजार ०६९ फ्लड लाईट व ७१ सर्च लाईट व्यवस्था
विसर्जनस्थळी १८८ प्रथमोपचार केंद्र व ८३ रुग्णवाहिका
निर्माल्य गोळा करण्यास उपयोगी ठरणारे ३५७ निर्माल्य कलश व २८७ निर्माल्य वाहने
४८ निरीक्षण मनोरे व आवश्यक तेथे संरक्षक कठडे
विसर्जनस्थळी १३४ तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था
विसर्जन ऑनलाईन नोंदणी
सुविधा ही https://shreeganeshvirsarjan.com या संकेतस्थळावर उपलब्ध
विसर्जनासाठी येणाऱ्या वाहनांची चाके वाळूमध्ये रुतू नयेत यासाठी ४६० पोलादी प्लेटची व्यवस्था
सूचनांचे पालन करा
श्रीगणेश गौरव स्पर्धेचे आयोजनही यंदा करण्यात आले असून या स्पर्धेला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. मूर्ती विसर्जन व्यवस्थेसाठीचीही तयारी केलेली आहे. गणेशोत्सवादरम्यान महानगरपालिका व पोलीस दल यांच्याद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.