Ganesh Mahotsav: अवघ्या जनांचा त्राता विराजमान, सर्वत्र भक्तीचा महापूर अन् ‘मोरया’चा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 07:04 AM2022-09-01T07:04:39+5:302022-09-01T07:05:12+5:30

Ganesh Mahotsav: कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षांनंतर मुक्त वातावरणात बाप्पांचे स्वागत करता आल्याने जनसागराला भक्तीचा महापूर आल्याचे चित्र राज्यभरात सर्वत्र पहायला मिळाले

Ganesh Mahotsav: Crowds of people sitting, flood of devotion everywhere and jubilation of 'Morya' | Ganesh Mahotsav: अवघ्या जनांचा त्राता विराजमान, सर्वत्र भक्तीचा महापूर अन् ‘मोरया’चा जल्लोष

Ganesh Mahotsav: अवघ्या जनांचा त्राता विराजमान, सर्वत्र भक्तीचा महापूर अन् ‘मोरया’चा जल्लोष

Next

मुंबई : अवघ्या जनांचा त्राता असणारा सुखकर्ता, दु:खहर्ता गणरायाचे बुधवारी ढोलताशांच्या निनादात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात मोठ्या थाटामाटात घरोघरी आगमन झाले. कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षांनंतर मुक्त वातावरणात बाप्पांचे स्वागत करता आल्याने जनसागराला भक्तीचा महापूर आल्याचे चित्र राज्यभरात सर्वत्र पहायला मिळाले. बाळगोपाळांसह आबालवृद्ध या वातावरणात न्हाऊन निघाले. दहा दिवस बाप्पांच्या भक्तीचा माहोल असाच रंगत जाणार आहे. 
 दुपारी दीडच्या आत घरी ‘श्रीं’च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करायची होती. त्यामुळे मुहूर्त साधत बाप्पांना विधिवत घरोघरी नेण्यासाठी पहाटेपासून गर्दी दिसत होती. कोणी नवीन घेतलेल्या कारमधून तर कोणी दुचाकीवरून बाप्पांना घरी घेऊन जात होते. नटूनथटून आलेली मंडळी बाळगोपाळांसह ‘मोरया’चा गजर करीत बाप्पांना प्रेमभावाने घरी जात होती. ढोलताशांचा निनाद, मोरयाचा गजर, बाळगोपाळांची पिपाणी याने माहोल भक्तीरसाने चिंब झाला होता.
पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या टि्वटर अकाऊंटवर गणपती सोबतचा फोटो शेअर करीत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नारळांच्या करवट्यांपासून साकारलेला बाप्पा ! 
गणरायांच्या आगमनाचा उत्साह देशात सर्वत्र दिसून येत आहे. चेन्नईमध्ये एका मंडळाने नारळांच्या करवट्यांपासून बनविलेली गणेशमूर्ती सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे. एक चिमुरडी या बाप्पासोबत सेल्फी घेत आहे. 

सार्वजनिक मंडळाच्या मिरवणुका थाटामाटात
मुंबई, पुण्यासह सर्वत्र सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचे राजेशाही मिरवणुकीने आगमन झाले. सर्वच ठिकाणी भक्तांच्या गर्दीचा अक्षरश: महापूर लोटला होता. 
पुण्यातील पाच मानाच्या गणपतींसह मोठ्या मंडळांच्या गणपतींची वाजत-गाजत थाटामाटातील मिरवणुकीने प्रतिष्ठापना झाली. सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेला जल्लोष दुपारी साडेतीनपर्यंत सुरू होता. मिरवणूक मार्ग गर्दीने अक्षरश: ओसंडून वाहत होता.
पुण्याचे ग्रामदैवत असलेला मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची तसेच मानाचा दुसरा गणपती असलेल्या तांबडी जोगेश्वरी मंडळाची मिरवणूक परंपरेप्रमाणे पालखीतून निघाली.
मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम मंडळाची मिरवणुकीत महिलांचे ढोल-ताशा पथक लक्षवेधी ठरले.
मानाचा चौथा गणपती असेलेल्या तुळशीबाग मंडळाच्या मिरवणुकीतील ढोल पथकांना परिसर दणाणून गेला. मानाचा पाचवा गणपती अर्थात केसरीवाडा गणेशाची मिरवणूक चांदीच्या पालखीतून काढण्यात आली. ढोल-ताशा आणि बिडवे बंधू यांचे नगारा वादन मनमाेहक ठरले.

वरुणराजाचा अभिषेक
औरंगाबाद : ‘ढोल ताशाचा आवाज तरररा झाला गणपती माझा नाचत आला...’हे जुने गाणे खूप लोकप्रिय झाले होते पण बुधवारी या गाण्याचे शब्द बदलून गेले. ‘मेघांचा गडगडाट झाला, गणपतीराज घरोघरी आला...’ असे चित्र औरंगाबादकरांना अनुभवायला मिळाले. मुसळधार पाऊस सोबत घेऊनच गणराज घरोघरी विराजमान झाले. सर्वांना जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. ती विघ्नहर्त्याने पहिल्याच दिवशी पूर्ण केली. पुण्यातही दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला. 

वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरती
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गणपतीची आरती पार पडली. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प करूया. असं म्हणत यावर्षीचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त होणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय सागर या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली. यावेळी पत्नी अमृता मुलगा, आई आणि कुटुंबीय उपस्थित होते.

Web Title: Ganesh Mahotsav: Crowds of people sitting, flood of devotion everywhere and jubilation of 'Morya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.