Ganesh Mahotsav: गणेशभक्तांच्या खिशाला झळ! टोल कंपन्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला डावलले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 08:53 AM2022-08-30T08:53:36+5:302022-08-30T08:54:26+5:30
Ganesh Mahotsav: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला होता. माफीचे पास वाहन चालकांना दिले जात आहेत. मात्र, पास दाखवूनही टोल वसूल करणाऱ्या कंपन्या लोकांची फसवणूक करत आहेत
मुंबई : गणेशोत्सवासाठीकोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला होता. माफीचे पास वाहन चालकांना दिले जात आहेत. मात्र, पास दाखवूनही टोल वसूल करणाऱ्या कंपन्या लोकांची फसवणूक करत आहेत, असा आरोप वाहन चालकांनी केला आहे.
गणेशोत्सव काळात कोकण आणि गोवा या भागात जाण्यासाठी गणेशभक्त मोठ्या प्रमाणात खासगी आणि प्रवासी वाहनांचा वापर करतात. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना वाहनांची कागदपत्रे सादर केल्यानंतर टोलमधून सूट देण्याच्या सूचना आहेत. या सवलतीचा कालावधी २७ ऑगस्टपासून सुरू झाला असून तो ११ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. याविषयीच्या सूचना परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिल्या आहेत. तसेच वाहतूक पोलीस चौक्यांमध्येही हे पास उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
वाहन चालक संजय घावरे यांनी सांगितले की, कोकणात जाण्यासाठी ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’चे मोफत पास देऊनही फास्ट टॅगमधून पैसे कट केले जात आहेत. पास दाखवूनही टोल वसूल करणाऱ्या कंपन्या लोकांची फसवणूक करत आहेत. रस्त्याला आणि टोल नाक्यावर गर्दी खूप असल्याने वाद घालण्यापेक्षा लोक इच्छित स्थळी जाण्याला प्राधान्य देत असल्याने कंपनीचा फायदा होत आहे. माझे एकूण ५२३ रुपये कापले गेले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला डावलले
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीचे पास दिले जात आहेत. पास असूनही वाहनचालकांना नाहक भुर्दंड पडत आहे. कंपनीने कपात करण्यात आलेले पैसे परत करावेत.
-हर्ष कोटक, सचिव, बसमालक संघटना