गिरगाव, दादर, जुहू चौपाट्यांना हवे ‘विमा सुरक्षा कवच’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 01:12 PM2023-09-13T13:12:35+5:302023-09-13T13:13:13+5:30

Ganesh Mahotsav: गर्दीची सुरक्षा लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने चौपाटी परिसराचा विमा उतरवावा. परिणामी, कोणतीही दुर्घटना घडल्यास मृतांच्या नातेवाइकांना वा जखमींना विम्याचे कवच लाभेल, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी महापालिकेचे आयुक्त अक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवून केली आहे.

Ganesh Mahotsav: Girgaon, Dadar, Juhu Chowpatty need 'insurance cover' | गिरगाव, दादर, जुहू चौपाट्यांना हवे ‘विमा सुरक्षा कवच’

गिरगाव, दादर, जुहू चौपाट्यांना हवे ‘विमा सुरक्षा कवच’

googlenewsNext

मुंबई - दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाचा सोहळा ‘याचि देही, याचि डोळा’ पाहण्यासाठी गिरगाव, दादर, जुहू आदी चौपाट्यांवर भाविक, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, मुंबईकर आणि पर्यटकांची गर्दी होते. गर्दीची सुरक्षा लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने चौपाटी परिसराचा विमा उतरवावा. परिणामी, कोणतीही दुर्घटना घडल्यास मृतांच्या नातेवाइकांना वा जखमींना विम्याचे कवच लाभेल, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी महापालिकेचे आयुक्त अक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवून केली आहे.

येत्या १९ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव सुरू होत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईमधील गिरगाव, दादर, जुहू चौपाट्यांवर होणारा गणेश सोहळा पाहण्यासाठी केवळ मुंबईकरच नव्हे, तर आसपासच्या शहरांतील नागरिकही येत असतात. तसेच मोठ्या संख्येने राजकीय नेतेमंडळी, उच्चपदस्थ अधिकारीही या दिवशी चौपाट्यांना भेट देतात. त्याचबरोबर दीड दिवस, पाचवा दिवस, सातव्या दिवशी चौपाट्यांवर गणेश विसर्जनासाठी प्रचंड गर्दी होते.
विसर्जन सोहळ्यानिमित्त मुंबई महानगरपालिकेतर्फे विविध सुविधा उपलब्ध करण्यात येतात. यासाठी हे कवच नक्कीच महत्वाचे ठरेल असे सांगण्यात आले.

मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी चौपाट्यांवर जातीने उपस्थित राहून भाविकांना मदत करीत असतात. गणेश विसर्जनाच्या दिवशी चौपाट्यांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतो. 

मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी, पोलिस आणि अन्य यंत्रणांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने चौपाट्यांवरील नियोजनात सहभागी होतात. त्याचबरोबर समुद्रात किनाऱ्यालगत जीवरक्षकही तैनात असतात. 

  विसर्जन सोहळ्यानिमित्त होणाऱ्या गर्दीत घातपात, नैसर्गिक आपत्ती, अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
  मिरवणुकांसोबत येणारे भाविक, विसर्जन सोहळा पाहण्यासाठी येणारे नागरिक, पर्यटक, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी, पोलिस, जीवरक्षक आदींची सुरक्षितता लक्षात घेऊन मुख्य विसर्जन स्थळांचा विमा काढावा.
  या सर्वांना विम्याचे कवच लाभेल, अशी मागणी होत आहे. गणेशोत्सव अवघ्या आठवड्याभरावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांनी तातडीने या मागणीचा विचार करावा, असे मत ॲड. दहिबावकर यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Ganesh Mahotsav: Girgaon, Dadar, Juhu Chowpatty need 'insurance cover'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.