- स्नेहा मोरेमुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने खरेदीची लगबग वाढली आहे. या खरेदीत गौराईचा थाट वेगळाच असतो. त्यात यंदा ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील दागिन्यांची क्रेझ आहे. लालबाग मार्केट परिसरातील दुकानांमध्ये खरेदीस येणाऱ्या महिला थेट याच दागिन्यांची मागणी करत आहेत. या चित्रपटात अभिनेत्रींनी घातलेला लक्ष्मीहार यंदा गौराईच्या सजावटीसाठी पसंतीस उतरत आहे.
लालबाग मार्केटमधील विक्रेत्यांकडे या लक्ष्मीहाराची किंमत ३८० रुपये आहे. याखेरीज, फायबर मटेरिअलपासून तयार केलेली संपूर्ण पोशाख दागिन्यांसह तयार गौरीची किंमत १८ हजार रुपयांपासून पुढे आहे. त्यातही बैठ्या स्वरूपातील वा उभी असलेली अशा दोन्ही स्वरूपातील गौरी उपलब्ध आहेत, तसेच अन्य दागिन्यांमध्ये कोल्हापुरी साज, बाजूबंद, तोडे, बांगड्या, नथ, ठुशी, चंद्रकोर, साखळ्या, कंबरपट्टा, बिंदी, पैंजण, कृत्रिम फुलांचे गजरे-वेण्या अशी वैविध्यता आहे. या दागिन्यांची किंमत २०० रुपयांपासून ते अगदी ६०० रुपयांपर्यंत आहे.