Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या गणरायांना निरोप, 'पुढच्या वर्षी लवकर या'चा भाविकांकडून गजर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 05:32 AM2022-09-02T05:32:00+5:302022-09-02T05:33:22+5:30

Ganesh Visarjan: आपल्या लाडक्या श्रीगणेशाची बुधवारी प्रतिष्ठापना करत त्याची मनोभावे पूजाअर्चा करून गणेशभक्तांनी गुरुवारी त्याला भावपूर्ण निरोप दिला.

Ganesh Mahotsav: One-and-a-half-day farewell to Ganesh Mahotsav, devotees urge 'Come early next year' | Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या गणरायांना निरोप, 'पुढच्या वर्षी लवकर या'चा भाविकांकडून गजर

Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या गणरायांना निरोप, 'पुढच्या वर्षी लवकर या'चा भाविकांकडून गजर

Next

मुंबई : आपल्या लाडक्या श्रीगणेशाची बुधवारी प्रतिष्ठापना करत त्याची मनोभावे पूजाअर्चा करून गणेशभक्तांनी गुरुवारी त्याला भावपूर्ण निरोप दिला. दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी मुंबईतल्या कृत्रिम तलावांसह नैसर्गिक विसर्जनस्थळी भक्तांचा महापूर लोटला होता. महापालिकेने त्यांच्यासाठी ठिकठिकाणी पुरेशा सेवा-सुविधाही पुरविल्या होत्या. गुरुवारी दुपारी बारा वाजल्यापासून सुरू झालेला हा निरोपाचा सोहळा रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे घरोघरी आगमन झाल्यानंतर गणेशभक्तांनी त्यांची मनोभावे सेवा केली. मोदकाचा नैवेद्य अर्पण करत हार, पाने, फुलांनी त्याची आरास केली. टाळ-मृदुंगाच्या गजरात त्याची आरती केली.

भजनी मंडळांनी बुधवारची रात्र जागवत आपल्या भजनांनी गणेशभक्तांचे कान तृप्त केले. सकाळ, दुपार आणि रात्रीच्या आरत्यांनी गणरायाचा गाभारा उजळून निघाला. बुधवारी सकाळपासून गुरुवारी रात्रीपर्यंत मुंबईत ठिकठिकाणी हेच चित्र पाहण्यास मिळाले. गुरुवारी दुपारी मात्र त्याला भावपूर्ण निरोप देण्याची वेळ आली, तेव्हा भक्तांचे डोळे पाण्याने भरले.

दीड दिवसांच्या सेवेनंतर भक्तांनी कृत्रिम तलावांसह नैसर्गिक विसर्जनस्थळी त्याला निरोप दिला. दक्षिण मुंबईत गिरगाव चौपाटीपासून जुहू चौपाटी, वेसावे चौपाटी, पवई तलाव, कुर्ला येथील शीतल तलाव, दादर चौपाटी या विसर्जन स्थळांसह गेट वे ऑफ इंडिया, भाऊचा धक्का, शिवडी बंदर, शीव तलाव, भांडूप येथील शिवाजी तलाव, बाणगंगा तलाव, वरळी चौपाटी, माहीम रेतीबंदर, गोराई या विसर्जन स्थळांवर गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. दरम्यान, विसर्जन स्थळांसह रस्त्यांवर गणेशभक्तांना अडचण येऊ नये, यासाठी त्यांना मदत करण्याकरिता मुंबई पोलीस, महापालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

Web Title: Ganesh Mahotsav: One-and-a-half-day farewell to Ganesh Mahotsav, devotees urge 'Come early next year'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.