Ganesh Mahotsav: ठुशी, बोरमाळ, नथ गौरीला सगळा नवा साज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 01:37 PM2023-09-11T13:37:55+5:302023-09-11T13:43:54+5:30
Ganesh Mahotsav: साज शृंगारात भर टाकणाऱ्या विविध दागिन्यांचा खजानाच मालाड पश्चिमेच्या क्रिस्टल प्लाझामध्ये पाहायला मिळतो. त्यात आता गणपती, तसेच अन्य सणांच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक ठुशी, बोरमाळ, रंगीबेरंगी आणि साड्यांवर मॅचिंग नथींना मोठी मागणी आहे.
- गौरी टेंबकर-कलगुटकर
मुंबई - साज शृंगारात भर टाकणाऱ्या विविध दागिन्यांचा खजानाच मालाड पश्चिमेच्या क्रिस्टल प्लाझामध्ये पाहायला मिळतो. त्यात आता गणपती, तसेच अन्य सणांच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक ठुशी, बोरमाळ, रंगीबेरंगी आणि साड्यांवर मॅचिंग नथींना मोठी मागणी आहे.
सणावारात अगदी ट्रेडिशनल लूक हवे यासाठी महिलांसह मुलीही नथीच्या प्रेमात पडलेल्या दिसतात. अशावेळी ही नथ गुलाबी, पिवळ्या, निळ्या, हिरव्या अगदी तुम्हाला पाहिजे त्या रंगाची मिळाली, तर त्यांच्या आनंदाला पारावर उरत नाही. तेव्हा ज्या रंगाची साडी त्याच रंगाची नथ आता आपण घालू शकतो. त्याच सोबत महाराष्ट्रीयन, अमेरिकन , ऑक्साइड, दागिन्यांसोबत सर्व प्रकारच्या दागिन्यांचे सुरेख सेट तुम्हाला या ठिकाणी मिळतील. जे खऱ्या सोन्यालाही लाजवतील. मात्र, क्रिस्टल प्लाझामध्ये तुम्हाला ते घाऊक खरेदी करावे लागतील.
कोरोनाकाळात जवळपास दोन वेळा सहा महिने मार्केट बंद होते. त्यामुळे बरेच विक्रेतेे टिकाव धरू शकले नाहीत असे व्होलसेल दागिने विक्रेते सोहन माळी यांनी बोलताना सांगितले. मात्र आता परिस्थिती सुधारली, असे म्हणाले.
ऑनलाइन विक्रेते आमच्याकडूनच विकत घेतात
सध्या नोकरदार महिलांना बाजारात येऊन खरेदी करणे सोयीचे नसल्याने रिसेलिंग व्यवसाय जोर धरत आहे.
ऑनलाइन विक्री करणारे आमच्याचकडून दागिने आणि ॲक्सेसरीज विकत घेऊन त्याची विक्री करतात.
यामध्ये किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानदारांना फटका बसला आहे, तसेच आम्ही जे काही डिझाइन बनवितो त्या ऑनलाइनवर सहज कॉपी होण्याचीही भीती असते.
मात्र, सध्या इंटरनेट सहज उपलब्ध असल्याने त्याला काही पर्याय नाही असेही सोहन माळी सांगतात.