Join us

गणरायाच्या आगमनात वरुणराजा ‘वाजंत्री’, शनिवार ते सोमवार जोरधारांचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 1:15 PM

Ganesh Mahotsav: गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात थांबून थांबून का होईना पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. श्रीगणेशाच्या आगमन सोहळ्यातही पावसाची बरसात होईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे.

मुंबई - गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात थांबून थांबून का होईना पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. श्रीगणेशाच्या आगमन सोहळ्यातही पावसाची बरसात होईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे. शनिवार ते सोमवारपर्यंत मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे.

दोन -तीन दिवसांपासून मुंबईत ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. त्याधी काही दिवस पाऊस बेपत्ता होता. त्यामुळे उकाडा होते. मात्र, बुधवारी सायंकाळी काही भागांत सरी कोसळल्या. काही ठिकाणी तर ऊन-पावसाचा अनुभव मुंबईकरांनी घेतला. बुधवारी मध्यरात्री पूर्व उपनगरात दहा मिनिटे मुसळधार सरी कोसळल्या. गुरुवारी सकाळी ७ वाजता बीकेसी, सायन, कुर्ला, साकीनाका, विद्याविहार परिसरात काही पडलेल्या सरींनी तारांबळ उडवली.

किती पाऊस झाला?बुधवारी सकाळी ८ वाजल्यापासून गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत मुंबई शहरात १८ मिमी, पूर्व उपनगरात २७ मिमी, तर पश्चिम उपनगरात १५ मिमी पावसाची नोंद झाली. 

मुंबईत गणेशोत्सवाच्या प्रारंभी जोरदार पाऊस पडेल. ७ ते ९ सप्टेंबरदरम्यान मुंबई महानगर प्रदेशालाही पाऊस तडाखा देईल. १२ ते १७ सप्टेंबर या सहा दिवसांत एमएमआरमध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे.    - माणिकराव खुळे,     हवामान तज्ज्ञ

टॅग्स :हवामानपाऊसगणेशोत्सव