मुंबई, - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याकरिता काही मार्गदर्शक सूचना केल्या असून त्याचे पालन सर्व गणेश मंडळांनी करावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे यावर्षीचा गणेशोत्सव हा साधेपणाने साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी सर्व संबंधित सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासनाची त्यांचे स्थानिक धोरणानुसार यथोचित पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासन यांचे मंडपा बाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत. श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट व घरगुती गणपतीसाठी २ फुटाच्या मर्यादित असावी., घरी विसर्जन करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना,मलेरिया, डेंगू असे आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय त्याचप्रमाणे स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. अशा प्रकारच्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना गृह विभागाच्या परिपत्रकामार्फत देण्यात आल्या आहेत. त्याचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन गृह विभागामार्फत करण्यात येत आहे.