मुंबई : गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन टाटा पॉवरने केले आहे. अधिकृत कनेक्शन घेण्यासाठी टाटाने मागील वर्षाच्या आकड्यांवर आधारित गणेश मंडळाशी संपर्क साधला आहे. गेल्या वर्षी १८० गणेश मंडळांना नवीन कनेक्शन दिली गेली होती. किमान कागदपत्रांसह तात्पुरत्या स्वरूपात मंडळाना वीजजोडणी देतानाच निवासी शुल्क श्रेणीतील दर आकारले जाणार आहेत.
गणेश मंडळे ग्राहक पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. याव्यतिरिक्त कस्टमर रिलेशन्स सेंटर्सकडे वैयक्तिकरीत्या किंवा एलईसीद्वारे ओळखीचा पुरावा, मालकीचा पुरावा, पालिकेचे ना-हरकत प्रमाणपत्र आणि चाचणी अहवाल यासारख्या किमान कागदपत्रांसह संपर्क साधू शकतात. मागील वर्षी मंडळांपर्यंत पोहोचून १५० हून अधिक जागरूकता सत्रे आयोजित केली होती. मंडळांना भेट देणाऱ्या सर्व भाविकांच्या सुरक्षेसाठी यावर्षीही अशाच प्रकारच्या उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरक्षेबाबत जनजागृती करण्याची योजना आहे.