मुंबई :
गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणारे प्लास्टर ऑफ पॅरिस, लाकूड, लोखंड, रंग अशी सारी सामग्री महागल्याने गणेशमूर्तींची किंमत ५० ते ६० टक्क्यांनी वाढली आहे. मात्र तितका दर वाढवून मिळत नसल्याने नाइलाजाने कमी मेहनतान्यात मूर्तिकाम करावे लागत असल्याची खंत मूर्तिकारांनी व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षी पीओपी १३० रुपये किलोने विकले जात होते. यंदा त्याचा दर २१० रुपयांवर गेला आहे. लोखंडही ५० ते ६० टक्के महागले आहे. गुजरातला पूर आल्याने तिकडून येणारे लाकूड येण्यात खंड पडला. परिणामी इथले लाकूड महागले आहे.
रंग महागलेगणेशमूर्तींसाठी वापरले जाणारे रंग तब्बल ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. गणेशमूर्तींच्या रंगकामात कोणतीही तडजोड करून चालत नाही. तसे केल्यास मूर्तींचा दर्जा खालावतो. त्यामुळे महागडे रंग घेण्यावाचून पर्याय राहत नाही.
चार फुटांची मर्यादा हटवली; पण...लहान मूर्ती करणे मूर्तिकारांना सर्वच बाबतींत परवडते; कारण त्याला लाकूड लागत नाही. त्या जागच्या जागी तयार करता येतात. मोठ्या मूर्तींचे सगळ्या बाबतींत बजेट वाढते. कारागीर लागतात. परांची बांधून मोठमोठे मंडप बांधावे लागतात. मंडपाची परवानगी घेण्यापासून सारे सायास करावे लागतात. चार फुटांची मर्यादा हटवण्यात आल्याने मोठ्या मूर्तींची मागणी वाढली; पण ते परवडत नाही. मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने कारागिरांच्या खाण्यासह राहण्याचीही व्यवस्था मूर्तिकारांनाच करावी लागते.
मागणी वाढली; पण वेळ कमी1. विशेषत: दोन वर्षांच्या काळानंतर गणेशमूर्तींची मागणी वाढली असली तरी वेळ खूपच कमी राहिला आहे. काम तर गणेशोत्सवाआधीच पूर्ण करावे लागते. त्यामुळे मूर्तिकारांवर खूपच ताण येत आहे. त्यामुळे कारागिरांसह संपूर्ण कुटुंबच या कामी लागते.2. पीओपी, लाकूड, लोखंड, रंग अशी सारीच सामग्री भरमसाट महागल्याने मूर्तींच्या किमती ५० ते ६० टक्क्यांनी महागल्या आहेत. मात्र गणेश मंडळांकडून तितकी वाढ मिळत नसल्याने किमान ३० टक्के तरी दर वाढले आहेत.
कोरोनातील लॉकडाऊनच्या दोन वर्षांच्या काळात खंड पडल्याने कारागिरांची उपलब्धता कमी झाली आहे. काेरोनाकाळात कारागीर मुंबईबाहेर गावी निघून गेले. आता ते येण्याआधी पूर्वीपेक्षा अधिक रोजंदारी मिळेल का, अशी विचारणा करतात. हे सारे परवडेनासे असते. आर्थिक गणित जुळवणे खूपच कठीण झाले आहे. - राहुल घोणे, मूर्तिकार
गणेशमूर्तीला लागणारे सारेच सामान महागल्याने किमती वाढवण्याशिवाय पर्याय राहिला नाही. कोरोना काळानंतर सगळी कोंडी फुटेल, अशी आशा होती. पण महागाईने कहर केल्याने ही कला कशी जोपासावी? यावर सरकारनेच काहीतरी तोडगा काढावा. - प्रशांत देसाई, मूर्तिकार