गणेश नाईकांनी उधळले विरोधकांचे मनसुबे
By admin | Published: February 25, 2015 03:58 AM2015-02-25T03:58:08+5:302015-02-25T03:58:08+5:30
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पाडण्याचे सेना - भाजपाचे मनसुबे गणेश नाईक यांनी उधळून लावले.
नामदेव मोरे, नवी मुंबई
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पाडण्याचे सेना - भाजपाचे मनसुबे गणेश नाईक यांनी उधळून लावले. पक्षांतराची चर्चा सुरू करून त्यांनी सर्वपक्षीयांच्या व स्वपक्षातील विरोधकांच्या राजकीय हालचाली थांबविल्या होत्या. ८० दिवसांची उत्सुकता त्यांनी १० मिनिटांच्या भाषणाने संपविली असून अनेक हेतू साध्य केले आहेत.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये आलेल्या अपयशानंतर राष्ट्रवादी काँगे्रसच्या कार्यकर्त्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पराभव होण्याची भीती अनेकांना वाटू लागली होती. १५ ते २० नगरसेवक पक्ष सोडण्याची चर्चा होती. शिवसेना व भाजपानेही राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून नाईकांचे खच्चीकरण करण्याची रणनीती आखली होती. अपयशातून खचलेल्या पदाधिकाऱ्यांना मनोबल वाढविण्याबरोबर पक्षातील फूट थांबविण्याचे आव्हान नाईक परिवारासमोर उभे राहिले होते. यामुळेच ४ डिसेंबरला विष्णुदास भावे नाट्यगृहात कार्यकर्ता मेळावा आयोजित करून साहेब राष्ट्रवादी सोडा, असे कार्यकर्त्यांकडून वदवून घेण्यात आले होते. नाईक भाजपामध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या. अनेकांनी प्रवेशाच्या तारखाही जाहीर केल्या होत्या. नंतर ते शिवसेनेमध्ये जाणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या झाल्या. सर्वच राजकीय पक्ष नाईक काय भूमिका घेणार याविषयी चर्चा करत राहिले. परंतु स्वत: नाईक यांनी या प्रकरणावर काहीही भाष्य केले नाही. अखेर २३ फेब्रुवारीला कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट करत चर्चेला पूर्णविराम दिला.
नगरसेवक शिवराम पाटील, अनिता पाटील, किशोर पाटकर तसेच सीवूडमधील माजी नगरसेवक भरत जाधव पक्ष सोडणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. पक्ष सोडणाऱ्यांमुळे राष्ट्रवादीला आता पूर्वीप्रमाणे फटका बसणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे, यामुळे नाईकांनीही ज्यांना माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल त्यांनी खुशाल जावे असे नगसेवकांना आणि कार्यकर्त्यांना मेळाव्यात बजावले आहे. या भूमिकेमुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढला आहे.