Join us

गणेश नाईकांना पुन्हा डिवचले, जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 11:24 AM

गणेश नाईक यांनी जशास तसे उत्तर देत जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि माजी मंत्री गणेश नाईक यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. आव्हाडांच्या टीकेला प्रत्युत्तर दिल्यानंतर, गणेश नाईक यांच्यावर पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी टीका केलीय. मी एकदा काय नवी मुंबईत जाऊन भाषण केलं, गणेश नाईकांनी कथकल्ली सुरु केली. अजूनतर मी शंभरवेळा जाणार आहे आणि त्याच्यानंतर माझा बापही येणार आहे, असे म्हणत गणेश नाईक यांच्यावर बोचरी टीका केली.  

जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते गणेश नाईक व नाईक कुटुंबीयांवर सडकून टिका केली होती. मी अशा गद्दराना विचारत नाही. जे बाळासाहेबांचे झाले नाही ते पवार साहेबांचे कसे होतील”, असा शब्दांत आव्हाड यांनी गणेश नाईकांवर घणाघाती टीका केली होती. अर्थातच, आव्हाड यांची बोचरी टीका गणेश नाईक यांना रुचली नाही. म्हणून, गणेश नाईक यांनीही तशाच भाषेत आव्हाड यांच्यावर प्रहार केला.   

गणेश नाईक यांनी जशास तसे उत्तर देत जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं. 'ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक,' असा डायलॉग मारत अभिनेते नाना पाटेकरस्टाईलने आव्हाड यांना चॅलेंज केलंय. तसेच, गणेश नाईकला खंडणी बहाद्दर म्हणून आरोप केले जातात. पण, माझ्यावर साधी एक एनसीही दाखल नाही. हाथी चलता है अपनी चाल से... असे म्हणत नाईक यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले होते. आता, नाईक यांच्या या टीकेनंतर आव्हाड यांनी पुन्हा गणेश नाईकांना डिवचले. 

मी एकदा काय नवी मुंबईत जाऊन भाषण केलं, गणेश नाईकांनी कथकल्ली सुरु केली. अजूनतर मी शंभरवेळा जाणार आहे आणि त्याच्यानंतर माझा बापही येणार आहे. नवी मुंबईकरांनो गणेश नाईकांचा छा... छैया बघायला तयार रहा, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी नाईक यांच्यावर प्रहार केला. दरम्यान, नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजपा नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :जितेंद्र आव्हाडगणेश नाईकनवी मुंबई