अशी आहे भाजपची रणनीती, गणेश नाईक, संजीव नाईकांना ठाणे, ओवळा-माजिवड्याची सुभेदारी?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 03:37 AM2019-07-30T03:37:15+5:302019-07-30T03:37:39+5:30
संदीप नाईकांना ऐरोली आंदण : एकनाथ शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न
ठाणे : एकीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे. दुसरीकडे आता नवी मुंबईचे सर्वेसर्वा गणेश नाईक हे तब्बल ५० हून अधिक नगरसेवकांसोबत भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे नाईक कुटुंब हे भाजपमध्ये गेले, तर जिल्ह्याच्या सत्तेची समीकरणेच संपूर्ण बदलण्याची शक्यता आहे. युतीमध्ये सध्या खटके उडत असल्याने नाईक कुटुंबाला भाजपची मोठी लॉटरी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गणेश नाईक यांना ठाणे विधानसभा, संदीप नाईक पुन्हा ऐरोली आणि संजीव नाईक यांना ओवळा-माजिवडा हे विधानसभा मतदारसंघ बहाल करून या माध्यमातून नाईकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून एकीकडे ठाणे जिल्ह्यावर पक्षाची पकड मजबूत करून दुसरीकडे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना शह देण्याची रणनीती भाजपमध्ये सुरू झाली आहे. आगामी विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. त्यानुसार, मुंबईचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्यानंतर नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक यांचे नाव आता पुढे आले आहे. नाईक फॅमिली ही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्यासोबत दिमतीला ५० हून अधिक नगरसेवकांची फळी असून येत्या काही दिवसांत ते भाजपमध्ये डेरेदाखल होतील, असेही जवळजवळ निश्चित झाले आहे.
एकनाथ शिंदेंच्या वर्चस्वाला लावणार सुरुंग
गणेश नाईक यांना ठाणे विधानसभा देण्याची तयारी असल्याचे बोलले जात आहे. या माध्यमातून शहरात भाजपचे वर्चस्व प्रस्थापित केले जाणार असून ठाण्यातून शिवसेनेला हद्दपार करण्याचा विचार सुरू झाला आहे. याशिवाय, ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी नाईक हेच खमके उमेदवार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे असे झाल्यास संजय केळकर यांचाही पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे मागील निवडणुकीत ओवळा-माजिवडा मतदारसंघातून नवखा उमेदवार देऊनही भाजपने शिवसेनेला काँटे की टक्कर दिली होती. परंतु, आता तर संजीव नाईक यांना या पट्ट्यातून चालवण्याची चर्चा जोर धरूलागली आहे. नाईक हे यापूर्वी खासदार असल्याने त्यांचा या मतदारसंघाचा अभ्यास आहे. मीरा-भार्इंदरमध्ये नाईकांचे वर्चस्व असल्यामुळे ते शिवसेनेला टक्कर देऊ शकतात आणि हा मतदारसंघही भाजप आपल्याकडे घेऊ शकते, अशी रणनीती आहे.
ऐरोलीतून संदीप नाईक हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढतील, असेही बोलले जात आहे.
मुख्यमंत्री हे आमचे सर्वेसर्वा आहेत. शिवाय, श्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो निर्णय आम्हाला मान्य असेल. ते जो उमेदवार देतील, त्यांचा प्रचार करण्याबरोबरच त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमची असेल.
- नारायण पवार, गटनेते, भाजप
अशी आहे भाजपची रणनीती
च्नाईक फॅमिली भाजपमध्ये आल्यास नवी मुंबई महापालिकेवर भाजपचे कमळ फुलणार आहे. दुसरीकडे आधीच मीरा-भार्इंदर महापालिकासुद्धा भाजपने आपल्या ताब्यात घेतली आहे. आता हळूहळू कल्याण-डोंबिवली महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. नाईक यांना मानणारा या दोन्ही शहरांत मोठा वर्ग आहे. शिवाय, उल्हासनगरमधील कलानी कुटुंबाशी त्यांची जवळीक आहे.
च्जिल्ह्याच्या मुरबाड, शहापूर या ग्रामीण पट्ट्यांतही नाईक यांची पकड आहे. जिल्ह्यातील शिवसेनेतही त्यांचे अनेक समर्थक आहेत. यामुळे त्यांच्या येण्यामुळे भाजप एक तीर में अनेक निशाणे साधणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री आमचाच, असा वाद सुरू झाला आहे.
च्इतर अनेक मुद्द्यांवरूनही या दोघांमध्ये खटके उडत आहेत. त्यामुळे युती तुटली तर त्याचा फायदा घेण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. त्यानुसार, नाईक कुटुंबाला भाजप संपूर्ण ठाणे जिल्हा आंदणच देणार असल्याची चर्चा आहे.