Join us

राष्ट्रवादीच्या फ्रंटसीटवर गणेश नाईक विराजमान

By admin | Published: April 30, 2015 11:34 PM

माजी मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला एकहाती विजय मिळवून दिला. या विजयामुळे त्यांना श्रेष्ठींनी बॅकसीटवरून फ्रंटसिटवर आणले आहे.

नारायण जाधव ल्ल ठाणेमाजी मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला एकहाती विजय मिळवून दिला. या विजयामुळे त्यांना श्रेष्ठींनी बॅकसीटवरून फ्रंटसिटवर आणले आहे. लोकसभा निवडणुकीत पुत्र संजीव यांचा अन् पाठोपाठ बेलापूर मतदारसंघात स्वत: गणेश नाईक यांचा अनपेक्षित पराभव झाला. त्यानंतर कार्यकर्त्यांत आलेली मरगळ, त्यातच उठवलेल्या भाजपा प्रवेशाच्या वावड्या अन् त्यात भरीसभर म्हणून पक्षश्रेष्ठींनी केलेले दुर्लक्ष अशा गर्तेत सापडलेल्या नाईक यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या. त्यामुळे त्यांना पक्षानेही मानाचे स्थान दिले आहे. नवी मुंबई महापालिकेतील विजयामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या राज्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना एकदम उभारी मिळाली असून, अशा पद्धतीने नियोजनबद्धरीत्या विकासाचा अजेंडा जनतेसमोर नेल्यास प्रतिकूल परिस्थितीतही विजय कसा मिळविता येऊ शकतो, याचे चांगले उदाहरण गणेश नाईक यांनी दाखवून दिले आहे. त्याचे अनुकरण पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वत्र करावे, असे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मुंबईत बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झाली. बैठकीत पवारांसह पक्षाचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील यांनी त्यांचे जाहीर कौतुक अभिनंदनच केले. एवढेच नव्हे तर एरवी बॅकसीटवर बसणाऱ्या नाईक यांना एकदम फं्रटसीटही दिली. त्यामुळे पक्षाने आगामी रणनीती निश्चित केल्याची चर्चा अहे. याच मंडळींनी ठाणे-पालघर जि.प.ची जबाबदारी ज्युनिअर नेत्यांवर सोपवली होती. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपात स्वत:च्या कुटुंबातील एकाही सदस्यास तिकीट न देण्याच्या कृतीचेही शरद पवारांनी कौतुक केले. पक्षातील इतर नेत्यांना कानपिचक्या दिल्या. तसेच एरवी पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात, राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत पहिल्या रांगेत नाईकांना आजपर्यंत क्वचितच स्थान देण्यात आले आहे. परंतु, बुधवारी झालेल्या कार्यक्रमात शरद पवार, अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील यांच्यासोबत नाईक यांना पहिल्या रांगेत मानाचे स्थानच दिले. एव्हढेच नाही तर त्यांचा कित्ता इतर नेत्यांनी गिरवावा, असे आवाहन शरद पवारांनी केले.