लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शहरातील सिंगल स्क्रीन चित्रपटगृह काळाच्या पडद्याआड गेले आहे. सुमारे ७० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले मात्र १५ वर्षे बंद असलेले, तरीही आपल्या अस्तित्वाच्या खुणा कायम टिकवून असणाऱ्या लालबाग अर्थात गिरणगावातील गणेश टॉकीजच्या या खुणाही आता मिटल्या आहेत. हे टॉकीज जमीनदोस्त केले आहे. त्या जागेवर मॉल किंवा टॉवर उभारण्याची शक्यता आहे.
काळाचौकी, गणेश गल्ली आणि चिंचपोकळीला जोडणाऱ्या सिग्नलजवळ १९६० साली हे टॉकीज उभे राहिले. या ठिकाणी हिंदी सिनेमे प्रदर्शित होत. गिरणगावातील हे लोकप्रिय टॉकीज होते. १५ वर्षांपूर्वी एका विकासकाने ते ताब्यात घेतले. मात्र, त्याने ते पुढे चालू ठेवले नाही. गेल्या काही दिवसांत या टॉकीजची वास्तू जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे खऱ्या अर्थाने या टॉकीजचे नामोनिशाण मिटले आहे. नव्या वास्तूत या टॉकीजला स्थान मिळाले तर पुन्हा एकदा रसिकांची पावले तिकडे वळतील, अशी आशा आहे.
टॉकीजच्या जवळच राहणारे शिवाजी पारकर या आठवणींची पाने उलगडवतात. टॉकीज खूप लोकप्रिय होते. गिरणगावातील हे पहिले वातानुकूलित टॉकीज असल्याने लोकांची झुंबड उडत असे. सगळ्याच सिनेमांचे खेळ हाऊसफुल होत. काही वेळेस हिंदीतील कलाकारही इथे येत. ‘परवाना’ नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा अमिताभ बच्चन आणि नवीन निश्चल आले होते.-शिवाजी पारकर, टॉकीजशेजारी राहणारे
ज्या चित्रपटाला जास्त प्रतिसाद मिळे, तो सिनेमा या ठिकाणी दोन आठवडे मुक्काम करे. बॉबी सिनेमाने अनेक आठवडे इथे तळ ठोकला होता. काही वेळेला या टॉकीजमधून उतरलेला सिनेमा आणखी काही महिन्यांनी पुन्हा याच टॉकीजमध्ये दाखल होई. बाराशेची क्षमता असणाऱ्या या टॉकीजमध्ये स्टोल, अपर स्टोल आणि बाल्कनी अशी रचना होती.-दिलीप ठाकूर, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक