प्रतापसिंह माने -- गोटखिंडी (ता. वाळवा) येथील झुंझार चौकात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची गेल्या ३५ वर्षांची परंपरा न्यू गणेश तरुण मंडळाने आजही जपली आहे. यावर्षी इस्लामपूर विभागाच्या पोलीस उपविभागीय अधिकारी वैशाली शिंदे यांच्याहस्ते गुरुवारी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.गेल्या ३५ वर्षांपूर्वी म्हणजे १९८० मध्ये येथील ज्येष्ठ जाणकरांनी गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले; पण त्या काळात अति पाऊस असल्याने गणपतीची प्रतिष्ठापना कोठे करावयाची, हा प्रश्न निर्माण झाला. त्यावर हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रित येऊन, मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून प्रत्येकवर्षी गणपतीची प्रतिष्ठापना मशिदीमध्ये करण्याची परंपरा जपली आहे. मुस्लिम बांधव दररोज एकत्रित येऊन गणपतीची आरती करतात, तर मुस्लिमांचा रोजा हिंदू बांधव करीत असतात. गणेशोत्सव काळात मुस्लिम बांधव मांसाहार करीत नाहीत. १९८२ मध्ये मोहरम व गणेशोत्सव एकाचवेळी आल्याने एकाच ठिकाणी श्री गणेशमूर्ती व पंजाची स्थापना करण्यात आली होती. येथील हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रित उत्सव साजरे करून गुण्या-गोविंदाने नांदत आहेत. यंदा या न्यू गणेश मंडळाने झुंझार चौक ते अमृतेश्वर देवालयापर्यंत विद्युत रोषणाई केली आहे. गणेशोत्सव काळात दररोज सामाजिक, पौराणिक नाटिका सादर केल्या जातात. मंडळाने रक्तदान, वृक्षारोपणासारखे अनेक उपक्रम राबविले आहेत. येथील सर्वात मोठे व हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारे मंडळ, अशी त्याची ओळख आहे. गुरुवारी मंडळाचे अध्यक्ष गणेश फाळके, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष लालासाहेब थोरात, अॅड. अर्जुन कोकाटे, विनायक पाटील, माजी सरपंच रहिना जमादार, दस्तगीर इनामदार, रफिक मुलाणी, सलीम लेंगरेकर, महंमद पठाण, सदानंद महाजन, अंकुश जाधव, पवन पाटील, दीपक पाटील, प्रमोद जाधव, हणमंत जाधव, बबलू शेजावळे उपस्थित होते. ‘ईद’ला कुर्बानी नाही यावर्षी गणेशोत्सव काळातच मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण आला आहे; पण येथील मुस्लिम बांधव ईदला फक्त नमाजपठण करणार आहेत, ‘कुर्बानी’ करणार नाहीत, असे मुस्लिम बांधवांनी सांगितले.
गोटखिंडीच्या मशिदीत गणेशोत्सव
By admin | Published: September 17, 2015 11:07 PM