पाणावलेल्या डोळ्यांनी बाप्पाला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 04:15 AM2018-09-25T04:15:10+5:302018-09-25T04:15:16+5:30
गणरायाचा अखंड जयघोष करत तमाम मुंबईकरांनी अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोप दिला. पाणावलेले डोळे आणि गहिवरल्या मनांची या वेळी चौपाटीवर दाटी झाली.
मुंबई : गणरायाचा अखंड जयघोष करत तमाम मुंबईकरांनी अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोप दिला. पाणावलेले डोळे आणि गहिवरल्या मनांची या वेळी चौपाटीवर दाटी झाली. अफाट जनसागराच्या साथीने अंतर्धान पावू लागलेल्या असंख्य गणेशमूर्तींना पाहून भक्तजनांच्या गळ्यात हुंदका दाटला आणि जनांच्या रंगात रंगलेला आसमंत ‘गणरंगात’ न्हाऊन निघाला. ‘पायी हळूहळू चाला’ असे म्हणत विसर्जनासाठी बाप्पा चौपाटीवर येत गेले; तेव्हा सागराच्या लाटांनीही गणरायाचे चरणस्पर्श करण्यासाठी किनाऱ्याकडे धाव घेतली आणि विसर्जनाचा हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला.
सकाळपासूनच लालबाग- परळमध्ये विसर्जन मिरवणुकांनी जोर धरला होता. लालबागच्या राजाने मंडपाबाहेर दर्शन देताच भक्तांची प्रचंड गर्दी उसळली आणि या जनसागराच्या साथीनेच राजा मार्गस्थ होऊ लागला. दुपारी दीड वाजता चिंचपोकळीच्या नाक्यावर कॉटनग्रीनच्या राजाने सलामी देत विसर्जन मिरवणुकीचा माहोल गहिरा केला. चिंचपोकळी पुलाच्या पूर्वेकडील दिशेला त्याचवेळी गणेश गल्लीचा गणपती येऊन पोहोचला
होता. तर बाजूच्याच गल्लीत चिंतामणीच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला होता. समोरच्या दत्ताराम लाड मार्गावरून काळाचौकीचे गणपती मुख्य रस्त्यावर येऊ लागले होते.
लालबागच्या सिग्नलजवळ भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. दुपारी २ वाजता येथून परळ मार्केटचा राजा, परळचा विघ्नहर्ता आणि माटुंग्याच्या प्रगती मंडळाचे गणपती एकामागोमाग चालत होते. त्यांच्यामागून नरेपार्क, करी रोड व रंगारी बदक चाळीचे गणपती येत होते. या वेळी लालबागचा राजा भारतमाताच्या दिशेने पावले टाकत होता. थोड्या वेळात राजा भारतमाताला वळसा घालून पुन्हा लालबागच्या दिशेने चालू लागला.
गिरगाव परिसरात अनंत चतुर्दशीला सकाळपासूनच बाप्पांनी विसर्जनासाठी चौपाटीकडे प्रस्थान ठेवले. गिरगावात आधी लहान गणेशमूर्ती सागराची वाट चालू लागल्या आणि दुपारनंतर मोठ्या गणपतींनी गिरगाव गजबजले. दुपारी सव्वाचार वाजता चंदनवाडीचा गणपती गिरगाव चर्चच्या दिशेने मार्गस्थ होत होता. त्याच्यामागेच कोलभाट लेनचा गणपती दर्शन देत होता. साडेचार वाजता प्रार्थना समाजच्या नाक्यावरून उंच गणपतींचे दर्शन होऊ लागले. झवेरी बाजारच्या गणपतीसह खेतवाडीचे मोठे गणपती एकामागोमाग इथे येत होते. खेतवाडी ११ वी, ८ वी, ५ वी, १० वी आणि ७ व्या गल्लीच्या गणपतीने व्ही.पी. रोडवर दर्शन दिले. त्याचवेळी विल्सन शाळेच्या नाक्यावरही गणपतींची रीघ लागली होती.
सायंकाळी ५ वाजता दुसºया खत्तरगल्लीचा महागणपती मंडपाबाहेर पडत होता. त्याच सुमारास ठाकुरद्वारच्या जयकर मार्गावरून मुंबईच्या महाराजाची, म्हणजे मुगभाटच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक तालात निघाली होती. तर खाडिलकर मार्गावरून गिरगावचा राजा; अर्थात निकदवरी लेनच्या गणपतीने सी.पी. टँककडे प्रस्थान ठेवले होते. भक्तांच्या टोप्यांवर राजाची ओळख मिरवत पारंपरिक पद्धतीने राजाची स्वारी हळूहळू पुढे येत होती.
समोरासमोरच्या इमारतींतून बांधलेले भलेमोठे हार राजाच्या गळ्यात विसावत होते. या ठिकाणी भक्तांचा आणि भक्तीचा अपूर्व मेळा भरला होता. गिरगावात गणरंगाने ताल धरला असतानाच केनेडी ब्रिजही भाविकांनी फुलला होता. गिरगावातून चौपाटीकडे निघालेल्या गणपतींना डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी येथे गर्दी उसळली होती. केनेडी ब्रिजवरून भक्तांचा प्रवाह चौपाटीकडे मार्गस्थ होत होता. वरुणराजाने कृपा केल्याने गिरगाव चौपाटीवर भाविकांच्या उत्साहाला उधाण आले होते.