गणरायाच्या सजावटीला नक्षीदार पडद्यांचा, चंदेरी मखराचा ‘साज’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 11:12 AM2023-09-17T11:12:21+5:302023-09-17T11:12:39+5:30
पडदे, शाल, झालर, कापडी मखर आणि फुलांना मागणी
मुंबई : लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी थोडेच दिवस शिल्लक असल्याने गणपतीच्या सजावटीसाठी गणेशभक्तांची बाजारात धावाधाव सुरू आहे. कमी खर्चात, कमी वेळेत पर्यावरणपूरक सजावटीवर गणेशभक्तांचा जोर आहे. त्यामुळे मराठमोळ्या सजावट वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेल्या लालबाग बाजारात गणरायाच्या सजावटीत यंदा नक्षीदार कापडी पडदे आणि चंदेरी कापडी मखर, शाल, झालर आणि रंगीबेरंगी कापडी फुले मिळवण्यासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली आहे.
सार्वजनिक गणपती मंडळे आणि घरगुती गणपती असलेल्या गणेशभक्तांसाठी लालबाग मार्केट हक्काचा बाजार आहे. मराठमोळ्या सण उत्सवाच्या लागणाऱ्या वस्तू येथे सहज मिळतात. त्यामुळे सजावटीसाठी मनासारख्या वस्तू मिळवण्यासाठी गणेशभक्तांची लालबाग बाजारात गर्दी असते. यंदा नक्षीदार पडद्यांची मोठी क्रेझ आहे. गुलाबी चंदेरी पिवळे आणि छापील नक्षीदार झालर लावलेल्या पडद्यांची जोरदार विक्री सुरू आहे.
नक्षीदार चंदेरी-सोनेरी पडदे
चंदेरी पडद्याची गणेशभक्तांमध्ये यंदा मोठी क्रेझ आहे. त्यातही लहानमोठे नक्षीदार पडदे उपलब्ध असल्याने खरेदीसाठी झुंबड दिसते. चंदेरी, पिवळे गुलाबी नक्षीदार पडदे, तसेच छापील देखावे असलेले पडदे, झालर, मखर यांच्या खरेदीसाठी अजूनही जोर असल्याचे येथील व्यापारी मनोहर शिंदे यांनी सांगितले. कापडी मखरासाठी लालबाग बाजारात कोटीची उलाढाल होते. सध्या बाजारात ५०० रुपयांपासून ते ३ हजारपर्यंत विविध पॅटर्नमध्ये मखर आहेत. चंदेरी मखर आणि मुलायम धाग्यांपासून तयार केलेले मखर मिळावे म्हणून भक्तांची गर्दी आहे.