गणेशभक्तांना बाप्पाचे अन् चोरांचेही दर्शन; लोकलमधून २२२ मोबाइल झाले लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 12:34 PM2023-10-01T12:34:44+5:302023-10-01T12:35:02+5:30
याच गर्दीचा फायदा घेत, चोरांनीही आपले हात साफ करून घेतले. मुंबईत गणेशोत्सव काळात २२२ भाविकांचे मोबाइल रेल्वेतून लंपास झाले.
मुंबई : मुंबईत गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी देशाच्या कोनाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. याच गर्दीचा फायदा घेत, चोरांनीही आपले हात साफ करून घेतले. मुंबईत गणेशोत्सव काळात २२२ भाविकांचे मोबाइल रेल्वेतून लंपास झाले.
मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलमधून सुमारे ७० ते ८० लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. सकाळी, सायंकाळी गर्दीच्या वेळेत प्रत्येक लोकलमध्ये प्रवाशांना धक्काबुक्की सहन करत प्रवास करावा लागतो. याच धक्काबुक्कीचा, गर्दीचा फायदा घेत, चोरटे प्रवाशांच्या खिशात हात टाकून मोबाइल लंपास करतात. गणेशोत्सव काळात लोकलमधून प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांचे मोबाइल चोरांनी लांबविले असून, या काळात २०० हून अधिक मोबाइलची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. मोबाइलनंतर पाकीट आणि बॅगचोरी करणाऱ्यांचेही प्रमाण जास्त आहे.
कुठे होते मोबाइल चोरी
मुंबईसह उपनगरातील रेल्वे स्थानकांवर दररोज सरासरी ३० मोबाइल चोरीच्या घटनांची नोंद होते. स्कायवॉक, पादचारी पूल, लोकलमधील गर्दीचा फायदा घेत, दररोज ३० हून अधिक मोबाइल चोरीला जातात.
गर्दीच्या ठिकाणी प्रवासी बोलताना त्यांच्या हातावर मारून मोबाइल लंपास केले जातात. कित्येक ठिकाणी सीसीटीव्ही नादुरुस्त आहेत, त्यामुळे चोर पकडणे कठीण होते. आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. सीसीटीव्ही वाढविण्याची गरज आहे, तसेच पोलिसांची गस्त वाढवावी, तरच चोरट्यांना धाक बसेल.
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय प्रवासी महासंघ.
लालबागला २५ सप्टेंबर रोजी गणपती पाहण्यासाठी गेलो होतो. चिंचपोकळी स्थानकात उतरलो असता, मोबाइल नसल्याचे लक्षात आले. - जय मोरे, प्रवासी