Join us  

गरजूंना अर्ध्या दरात औषधे देणारा ताडदेवचा राजा

By संतोष आंधळे | Published: August 17, 2022 11:53 AM

हाजीअली येथील लहान मुलांच्या हृदयाच्या विकारांसाठी त्यांनी रुग्णालयातर्फे बोलणी करून ठेवली आहे.  त्यांना शासनाच्या योजनेत बसवून आणि जर त्यात ते बसत नसतील तर त्यांच्यासाठी फंड उभारून उपचार केले जातात.

- संतोष आंधळेमुंबई  : अनेकदा उपचार आणि औषध प्रचंड महागडे असतात. औषधे परवडत नसल्याने प्रसंगी अनेकांची फरफट होते. अशा गरजूंच्या मदतीसाठी ताडदेवचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेले ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ धावून जात आहे.  गरजू रुग्णांना औषधे ५० टक्के किमतीत मिळवून देण्याचे काम मंडळ करत आहे. मंडळ यंदा ८३ वे वर्ष साजरे करत आहे.

या मंडळातर्फे वर्षभर गरीब आणि गरजू रुग्णांना अर्ध्या किमतीत औषधे पुरविली जातात. विशेष म्हणजे ज्या लहान मुलांना हृदयविकाराचे आजार आहेत आणि त्यांना शस्त्रक्रिया करण्याची गरज लागली तर ती मोफत करण्यासाठी मंडळ सैदव तत्पर असते. स्वस्त दरात औषधे देण्यासाठी काही धर्मादाय संस्थांना मंडळ सोबत घेत असते.  

हाजीअली येथील लहान मुलांच्या हृदयाच्या विकारांसाठी त्यांनी रुग्णालयातर्फे बोलणी करून ठेवली आहे.  त्यांना शासनाच्या योजनेत बसवून आणि जर त्यात ते बसत नसतील तर त्यांच्यासाठी फंड उभारून उपचार केले जातात. लहाने मुलांच्या आरोग्यासाठी मंडळाचा प्राधान्यक्रम असतो. 

कोरोनाकाळात भरीव कामगिरीकोरोनाच्या काळात काही  मंडळांना वर्गणी न मिळाल्याने त्यांनी त्यांच्या नियमित उपक्रमांमध्ये कपात केली होती. मात्र, ताडदेवच्या राजाने कोरोनाकाळात भरीव कामगिरी केली होती. त्यांनी ताडदेव येथील मुंबई महापालिकेची शाळा घेऊन सैफी रुग्णालयाच्या डॉक्टरांची मदत घेऊन विभागातील नागरिकांसाठी  विशेष विलगीकरण कक्ष तयार केले होते. यामध्ये विलगीकरण कक्षात उपचार घेण्याची सोय करण्यात आली होती. त्याचप्रमाणे तेथेच जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.  मंडळातर्फे मंगलदास मार्केट येथील माथाडी कामगारांसाठी १००० लस देण्याचे नियोजन केले गेले होते. त्याचप्रमाणे कल्याणच्या एका संस्थेने मंडळाला संपर्क करून तृतीयपंथींसाठी लसीकरणाची मागणी केली होती. त्यावेळी जसलोक रुग्णलयाच्या सहकार्याने मंडळाने १५०० लस या तृतीयपंथीकरिता उपलब्ध करून दिले होते. त्यासोबत विभागातील ज्येष्ठ आणि अन्य नागरिकांसाठी ६००० लस उपलब्ध केल्या होत्या. 

हार, नारळ  नको, वही आणि पेन द्या!गेल्या काही वर्षांपासून गणेशभक्तांना आवाहन करण्यात येत आहे गणपतीला नारळ आणि हार तुरे आणण्यापेक्षा गणेश मंडपात पेन आणि वही दान करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमाला काही वर्षांत  चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या वर्षी २००० पेन, तर २५०० वही दान करण्यात आले. ते गेल्या वर्षी चिपळूण येथील पूरग्रस्तांना पाठविण्यात आले. त्याचप्रमाणे पालघर येथील आदिवासी पाड्यातील सरस्वती विद्या मंदिर शाळेला खेळाचे साहित्य, मुलासाठी कपडे आणि संगणक शाळेला पुरविण्यात आले आहे. 

आरोग्यासाठी मदत करणारे मंडळआमच्या मंडळाची ओळख ही आरोग्यासाठी मदत करणारे मंडळ म्हणून आमची ओळख आहे. वर्षभरात विविध विषयांवर आरोग्याची मोफत तपासणी शिबिरे घेतली जातात. आम्ही जीवन ज्योत या सामाजिक संस्थेसोबत बोलणी करून रुग्णांना ५० टक्के दरात औषधे देतो. तर हाजी अली येथील लहान मुलांच्या  एस आर सी सी रुग्णालयाच्या सहकार्याने लहान मुलांच्या हृदयविकारांवरील उपचार आणि गरज पडली तर शस्त्रक्रिया करून देत असतो. या सगळ्या योजना या गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आहेत. - सिद्धेश माणगावकर, कार्याध्यक्ष 

हिशेब तपासनिसाची मोठी जबाबदारीमाझ्या मते मंडळातील मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. कारण अनेक सार्वजनिक मंडळ आणि संस्थांमध्ये हिशोबावरून वाद होत असतात. माझी जबाबदारी आहे मंडळातील गणेश भक्तांकडून आलेले पैसे हे योग्य पद्धतीने खर्च होत आहेत का? त्याचप्रमाणे शक्यतो  सगळ्या व्यवहाराची बिले, खर्चाचा लेखा जोखा व्यवस्थित आहे की नाही, ही तपासण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. -गणेश भोसले,हिशेब तपासनीस 

टॅग्स :मुंबईगणेशोत्सव