शाडूच्या गणेशमूर्ती वाढताहेत
By admin | Published: August 23, 2015 04:07 AM2015-08-23T04:07:23+5:302015-08-23T04:07:23+5:30
मुंबापुरीत गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले असून, मुंबईकरांनी प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तींऐवजी शाडूच्या गणेशमूर्तींवर भर दिला आहे. त्याचेच द्योतक म्हणून
- महेश चेमटे, मुंबई
मुंबापुरीत गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले असून, मुंबईकरांनी प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तींऐवजी शाडूच्या गणेशमूर्तींवर भर दिला आहे. त्याचेच द्योतक म्हणून शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींना ‘संजीवनी’ देण्याचे काम लालबाग येथील सुभाष नाईक यांच्या कार्यशाळेत सुरू आहे. आणि आता तर या कामाने आणखी वेग पकडला आहे.
प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तींनी पर्यावरणाची हानी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर मुंबई महापालिकेसह सामाजिक सेवाभावी संस्थांनी शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींवर मुंबईकरांनी भर द्यावा, असे आवाहन केले. परंतु शाडूची मूर्ती महाग असल्याने मूर्तिकारांसह भाविकांनाही त्या खर्चीक वाटू लागल्या. तरीही शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींची संख्या वाढावी, म्हणून सातत्याने भर देण्यात आला. त्यामुळे आता कुठे पुरेशी जनजागृती झाली असून, जागरूक भाविक शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तीला प्राधान्य देत असल्याचे काहीसे चित्र निर्माण झाले आहे.
लालबागमधील नाईकांच्या कार्यशाळेत गेल्या ५६ वर्षांपासून केवळ शाडूच्या गणेशमूर्ती साकारण्यात येत आहेत. कोणताही साचा न वापरता केवळ हाताने साकारण्यात आलेल्या या गणेशमूर्ती अधिक सुबक दिसत आहेत. गणेश चतुर्थीला दोन महिने शिल्लक असताना या चित्रशाळेत शाडूच्या मूर्तीचे काम हाती घेण्यात येते. तब्बल ६० मूर्ती येथे साकारण्यात येतात. चित्रशाळेत संदेश वाडेकर, महेश साळसकर, निखिल नगरकर हे तरुण काम करत आहेत. विशेषत: टपाल खात्यातून निवृत्ती स्वीकारलेले पांडुरंग सुर्वे हे ज्येष्ठही येथे काम करत आहेत. उर्वरित आयुष्य मूर्ती सेवेत घालविण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून मूर्ती साकारणारे हात सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यरत असतात.
आता या मूर्ती भाविकांच्या घरी आगमनासाठीही सज्ज झाल्या असून, श्रींचे विसर्जन व्यवस्थित पार पडावे, म्हणून शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याकडे आमचा कल असल्याचे कलाकार नमूद करतात.
श्रीं च्या मा र्गा व री ल झा डां च्या फां द्या छा टा !
श्रींच्या आगमन आणि विसर्जन मार्गावरील झाडांच्या फांद्यांची लवकरात लवकर छाटणी करण्यात यावी, अशी मागणी बृहृन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने महापालिकेकडे केली आहे. महापालिकेनेही हे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. मुंबापुरीत गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्ती मंडपांकडे रवाना होऊ लागल्या आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींना अठरा फुटांचे बंधन असून, गणेशमूर्तीच्या आगमन आणि विसर्जनादरम्यान वाहनाची उंची, मूर्तीखालील साहित्याची उंची अशा अनेक बाबींमुळे गणेशमूर्तीची उंची अधिक होते. परिणामी अशा उंच गणेशमूर्तींना झाडांच्या फांद्या अडथळा ठरतात. हा अडथळा ऐनवेळी उद्भवू नये म्हणून या झाडांच्या फांद्या छाटण्याची विनंती महापालिकेला करण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी सांगितले.
विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाहून मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जन होते. या मार्गावरील झाडांच्या फांद्याही विस्तारल्या असून, त्या छाटण्यात याव्यात, असे समितीचे म्हणणे आहे. दरम्यान, गणेशोत्सवाकरिता महापालिका प्रशासनाने पूर्वतयारी केली असून, रस्ते दुरुस्ती व खड्डे बुजविण्याची कार्यवाही २८ आॅगस्टपर्यंत पूर्णत्वास नेणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे खड्डे लवकर बुजतील, असा आशावाद समितीने व्यक्त केला आहे.