गणेश विसर्जन : श्री गणेशाला साधेपणाने निरोप, मुंबईकरांनी दिले कृत्रिम तलावांना प्राधान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 04:04 AM2020-09-02T04:04:51+5:302020-09-02T06:43:47+5:30
मुंबई महापालिकेने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करत नागरिकांनी विसर्जन करतानाच यापुढेही कोरोनाचा बिमोड करण्याचा आपला निश्चिय कायम ठेवला.
मुंबई : ना ढोल ताशा, ना डिजे, ना गोंधळ, ना कसले प्रदूषण; असा एक उत्तम आदर्श सर्वांसमोर ठेवत मुंबईकरांनी कोरोनाचे समूळ उच्चाटन करताना श्री गणेशाला मंगळवारी साश्रू नयनांनी भावपुर्ण निरोप दिला.
मुंबई महापालिकेने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करत नागरिकांनी विसर्जन करतानाच यापुढेही कोरोनाचा बिमोड करण्याचा आपला निश्चिय कायम ठेवला. विशेषत: समुद्र अथवा नैसर्गिक विसर्जन स्थळांवर विसर्जनासाठी दाखल होण्याऐवजी गणेश भक्तांनी कृत्रिम तलावांना प्राधान्य दिले. सकाळपासून सुरु झालेला हा श्री गणेशाचा विसर्जन सोहळा मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी रात्री ऊशिरापर्यंत सुरु असतानाच आपल्या लाडक्या बाप्पाकडे ‘अवघ्या जगावर आलेले कोरोनाचे विघ्न दूर कर आणि पुढच्या वर्षी लवकर ये... ’ अशी प्रार्थनादेखील करण्यात आली.
मुंबई शहर आणि उपनगरातील गणेश मूर्ती विसर्जनाचा आणि कोरोनासारख्या संसर्गजन्?य परिस्थितीचा विचार करता महापालिकेची यंत्रणा गणेशाच्या विसर्जनासाठी सुसज्ज होती. पालिकेने ४४५ विसर्जन स्थळे निश्चित केली होती. यासाठी सुमारे २३ हजार कर्मचारी तैनात ठेवण्यात आले होते. अधिकारी-कर्मचारीही तैनात होते. मागील वर्षाच्या तुलनेत अधिकारी-कर्मचारी व अन्य कामगार यांची संख्या यावर्षी तिप्पट करण्यात आली होती. नागरिकांना शाडूमातीच्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन हे आपल्या घरच्या किंवा सोसायटीच्या स्तरावर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आणि या आवाहनास प्रतिसाद देत मुंबईकरांकडून शारिरीक दुरीकरण पाळून आणि संबंधित सूचनांचे पालन करत गणरायाला निरोप दिला जात होता.
मुंबई आणि उपनगरातील श्री गणेश विसर्जन सोहळ्यास सकाळीच सुरुवात झाली. दुपारी यास वेग आला. विसर्जन स्थळी सुरुवातीला घरगुती गणेश मूतीर्चे विसर्जन होऊ लागले.
गिरगाव चौपाटी आणि इतर छोट्या मोठ्या विसर्जन स्थळी कोणालाही पाण्यात प्रवेश दिला जात नव्हता. महापालिकेचे कर्मचारी वर्ग सर्व ठिकाणी तैनात करण्यात आले होते. जीव रक्षक ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते. विसर्जन स्थळी दाखल झाल्यानंतर गणेश मूर्ती महापालिकेच्या कर्मचारी वर्गाकडे सुपुर्द केली जात होती. त्यानंतर जीव रक्षक त्या मूतीर्चे विसर्जन करत होते. प्रत्येक विसर्जन स्थळी हाच कित्ता गिरविण्यात आला होता; हे यंदाच्या श्री गणेश विसर्जन सोहळयाचे वैशिष्टय होते.