'गणेशाचे कुटुंब साकारण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण केले!'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 05:36 AM2019-08-18T05:36:38+5:302019-08-18T05:36:58+5:30
आम्ही राज्यभरातील ९३ सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती बनवल्या आहेत. यामध्ये १७ मूर्ती ट्रॉलीवर तयार केल्या आहेत. २८ फूट उंचही मूर्ती आम्ही यंदा बनवली आहे.
- योगेश जंगम
गणेशभक्तांना बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली आहे. मूर्तिकारही आपल्या चित्रशाळेमध्ये गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरवत आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरातच नाही तर जगामध्ये प्रसिद्ध असलेले गणेश मूर्तिकार विजय खातू यांंच्या कन्या रेश्मा खातू यांच्याशी केलेली बातचीत. यंदा चिंचपोकळीच्या चिंतामणीचे शंभरावे वर्ष आहे. या शंभराव्या वर्षी गणपतीचे संपूर्ण कुटुंब साकारण्याचे स्वप्न माझ्या वडिलांचे होते, हे स्वप्न यंदा मला पूर्ण करता आले याचे समाधान आहे, असे जगविख्यात मूर्तिकार विजय खातू यांच्या कन्या रेश्मा विजय खातू यांनी या वेळी सांगितले.
यंदा चिंचपोकळीच्या चिंतामणीचे शंभरावे वर्ष आहे, यानिमित्त तुम्ही मूर्तीचे काय खास वैशिष्ट्य ठेवले आहे ?
- माझ्या वडिलांचे पूर्वीपासूनचे स्वप्न होते की, चिंतामणीच्या शंभराव्या वर्षी खास मूर्तीसह गणेशाचे संपूर्ण कुटूंब साकारायचे. हे स्वप्न मला या वर्षी पूर्ण करता आले. या वर्षी शंभर वर्षे पूर्ण झाल्याने आम्ही विशेष मेहनत घेऊन मूर्तीसह हे कुटुंब साकारले. यामध्ये गणेशमूर्तीसह रिद्धी-सिद्धी आणि शुभ-लाभ मूर्तींच्या स्वरूपात साकारले आहेत. आतापर्यंत शुभ-लाभ हे आपण अक्षरांमध्ये पाहत आलो आहोत, आम्ही यंदा पहिल्यांदाच हे मूर्ती स्वरूपामध्ये साकारले आहे. यामध्ये कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर न करता कला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या वडिलांची ही इच्छा पूर्ण करणे माझ्यासाठी एक मोठे आव्हान होते. हे साकारल्यावर मंडळाकडूनही चांगली प्रतिक्रिया आली. मंडळाच्या शंभराव्या वर्षी मूर्ती कशी असावी याचे मला परीक्षण करता आले.
गेल्या तीन वर्षांपासून तुम्ही तुमच्या वडिलांचा वारसा पुढे चालवत आहात, कसा अनुभव आला?
- मी वडिलांचा वारसा गेल्या तीन वर्षांपासून यशस्वीरीत्या चालवत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये मला खूप काही शिकायला मिळाले. वडील वर्षानुवर्षे मूर्ती साकारत होते. त्यामुळे वर्षानुवर्षे आमच्याकडून मूर्ती घेणाऱ्या मंडळांचा आमच्यावर विश्वास असल्याने आमच्याकडूनच मूर्ती घेतल्या जातात. त्यांनी बरीच माणसे जोडली होती. ही सर्व माणसे वेळप्रसंगी सल्लाही देतात, मदत करतात. मंडळे, अनुभवी कारागीर, मूर्तींचे साचे असल्याने मला काम करणे सोपे जात आहे़ काही वाईट अनुभवही येत आहेत. मूर्ती बनवण्यासाठी आवश्यक असलेली जागा मिळवण्यासाठी खूप राजकारण होत आहे. लालबाग-परळ ही गणेशोत्सवाची पंढरी म्हणतो, जर जागाच मिळाली नाही तर ही पंढरी कशी टिकणार.
आपल्या चित्रशाळेमध्ये या वर्षी किती गणेशमूर्ती साकारण्यात आल्या ? आणि कुठच्या ?
- आम्ही राज्यभरातील ९३ सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती बनवल्या आहेत. यामध्ये १७ मूर्ती ट्रॉलीवर तयार केल्या आहेत. २८ फूट उंचही मूर्ती आम्ही यंदा बनवली आहे.