Join us  

'अंधेरीचा राजा' यंदा पाटवा हवेलीत होणार विराजमान; सेलिब्रिटीही दर्शनासाठी लावतात हजेरी

By मनोहर कुंभेजकर | Published: September 05, 2024 3:03 PM

यंदाच्या थीममध्ये राजस्थानच्या राजेशाही वारशाचे सादरीकरण केले आहे. मंडपातील सजावट आणि प्रतिकृतींमध्ये हवेलीच्या झरोख्यांचे, नक्षीकामाचे आणि पारंपरिक घटकांचे जिवंत चित्रण हुबेहूब उभारले आहे.

मुंबई- गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असून पश्चिम उपनरातील अनेक गणेशोत्सव मंडळाकडून गणपतीची तयारी देखील जवळपास पूर्ण झाली आहे. अंधेरी पश्चिमेकडील आझाद नगर मेट्रो स्टेशन जवळ असलेल्या  आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे.

पश्चिम उपनगरातील मानाचा नवसाला पावणारा गणपती आणि विशेष म्हणजे संकष्टीला विसर्जन होणारा अशी अंधेरीच्या राजाची ख्याती आहे. यंदा अंधेरीचा राजा हा यंदा राजस्थान जैसलमर येथील पाटवा हवेलीत विराजमान होणार आहे. मंडळाचे यंदाचे हे 59 वे वर्ष आहे.दरवर्षी लाखो गणेशभक्तांसह अनेक सेलिब्रेटीं अंधेरीच्या राजाचे आवर्जून दर्शन घेतात. अंधेरीच्या राजाचा फर्स्ट लूक आउट आणि पाटवा हवेलीचा हुबेहूब देखावा आज समितीने पत्रकार परिषदेत पत्रकारांना दाखवला. यावेळी समितीचे प्रमुख मार्गदर्शक व माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर (शैलेश) फणसे,अध्यक्ष-अशोक राणे,कार्याध्यक्ष-महेंद्र धाडीया,सचिव-विजय सावंत,खजिनदार-सुबोध चिटणीस,प्रसिद्धीप्रमुख उदय सालीयन उपस्थित होते.

यंदाच्या थीममध्ये राजस्थानच्या राजेशाही वारशाचे सादरीकरण केले आहे. मंडपातील सजावट आणि प्रतिकृतींमध्ये हवेलीच्या झरोख्यांचे, नक्षीकामाचे आणि पारंपरिक घटकांचे जिवंत चित्रण हुबेहूब उभारले आहे.मंडपाच्या आतील भागात, ४० बाय ११० फूटांच्या क्षेत्रात, मुख्य गाभारा असेल जिथे ९ फूट उंचीची श्री अंधेरीचा राजा यांची मूर्ती स्थापित केली जाईल.  ही संपूर्ण सजावट ४५ दिवसांत ७० हून अधिक कुशल कारागीरांनी तयार केली आहे. याचे नेतृत्व धर्मेश शाह आणि त्यांच्या टीमने केले आहे—ज्यामध्ये सुतार, रंगारी, फॅब्रिकेटर, आणि कामगारांचा समावेश आहे. ही सजावट पर्यावरणस्नेही आहे.

भक्तांना दर्शनासाठी असेल ड्रेस कोड 

अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांसाठी समितीने यंदा सुद्धा ड्रेस कोड जारी केला आहे. हाफ पँट आणि शॉर्ट स्कर्ट परिधान करून येणाऱ्या भाविकांना अंधेरीचा राजा पाहण्यासाठी प्रवेश मिळणार नसल्याचे समितीने स्पष्ट केले. मात्र हाफ पँट आणि स्कर्ट परिधान करून येणार्‍या महिला व पुरुषांसाठी येथे लूंगी आणि फुल पँटही ठेवण्यात येणार आहे. हे कपडे परिधान करून भाविकांना बाप्पाचे दर्शन घेता येईल. हा नियम 15 वर्षांपूर्वी लागू करण्यात आला असून, तो दरवर्षी पाळला जात असल्याचे समितीचे अध्यक्ष अशोक राणे व खजिनदार सुबोध चिटणीस यांनी सांगितले.

आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीची १९६६ साली स्थापन झाल्यापासून गेल्या ५८ वर्षांपासून गर्वाने गणेशोत्सव साजरा करीत आहे. या भव्य उत्सवाबरोबरच, समिती विविध सांस्कृतिक आणि सामाजिक जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन वर्षभर करते, ज्यामध्ये दहीहंडी उत्सव, नवरात्र उत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती यांचा समावेश आहे. याशिवाय, समिती आरोग्य शिबिरे, क्रिकेट स्पर्धा आणि आजाद नगरमधील रहिवाशांसाठी इतर खेळांचे आयोजन करते. आम्ही पालघरमधील आदिवासींना कपडे, डाळी आणि धान्य वितरित करतो. आम्ही "गुणगौरव" कार्यकमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतो. - यशोधर (शैलेश )फणसे, प्रमुख मार्गदर्शक, आझाद नगर सार्वजनिक उत्सव समिती

टॅग्स :गणेशोत्सवगणेशोत्सव विधीगणेशोत्सव