मुंबई: कोरोना संकटाच्या काळानंतर अवघ्या देशभरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे मुंबईतच्या प्रसिद्ध गणपती मंडळांमध्ये घेतल्या जाणाऱ्या आघाडीच्या नावांमध्ये एक लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे नाव घेतले जाते. यंदा लालबागच्या राजाने (Lalbaugcha Raja) एक नवा विक्रम केल्याचे सांगितले जात आहे. अवघ्या चार दिवसांतच लालबागचा राजा मंडळात एक कोटीपेक्षाही अधिकची देणगी जमा झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
गेल्या चार दिवसांत लाखो गणेशभक्तांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यंदा लालबागच्या राजाच्या दानपेटीत गेल्या चार दिवसांत जमा झालेलं दान पाहता सरासरी चार ते पाच कोटी रुपयांचे दान जमा होण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. दरवर्षी लालबागचा राजाला किती देणगी जमा होते, याची माहिती मंडळाच्या वतीने दिली जाते. दुसरीकडे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणार आहेत.
चार दिवसांत १ कोटी ५० लाखांचे दान
चार दिवसांत ०१ कोटी ५० लाख रुपये इतके दान लालबागच्या राजाच्या दानपेटीत जमा झाले आहे. यामध्ये रोख रकमेसह नाण्यांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात सोने, चांदी भक्तांनी अर्पण केली आहे. जवळपास २०० तोने सोने आणि १७०० तोळे चांदीचे दान लालबागच्या राजाच्या दानपेटी अर्पण करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी २४ तास भाविकांची प्रचंड गर्दी असते. अनेकविध क्षेत्रातील दिग्गजांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. उद्धव ठाकरेंचा संयमी स्वभाव महाराष्ट्र पाहत आहे. त्यातच, आज उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. मुंबईतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी ११ दिवस भाविक अलोट गर्दी करतात. यंदा लालबागच्या राजाचा दरबार अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या देखाव्याने सजला आहे.