मुंबई
मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकारणीमध्ये उद्योजक अनंत अंबानी यांची कार्यकारी सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला आहे. यामुळे आता अनंत अंबानी देखील लालबागच्या राजाच्या मंडळाचाच एक महत्वाचा भाग बनले आहेत.
अनंत अंबानी गेल्या १५ वर्षांपासून लालबागच्या राजाच्या मंडळाशी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. तसंच अनंत अंबानी गणेशोत्सव काळात लालबागच्या राजाच्या विविध कार्यक्रमांना आवर्जुन उपस्थितीत लावताना आपण पाहिलं आहे. यासोबतच राजाच्या विसर्जनावेळीही ते गिरगाव चौपाटीवर उपस्थित असतात. रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून लालबागच्या राजाच्या मंडळाला विविध आरोग्य विषयक उपक्रमांसाठीही अंबानी कुटुंबीयांच्या वतीनं मदत केली गेली आहे.
"अनंत अंबानी यांच्या मानद सदस्यत्वासाठी मंडळाच्या वार्षिक बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. दरवर्षी मंडळाच्या मानद सदस्यत्वाची मुदत वाढवली जाते", असं लालबागचा राजा मंडळाच्या वरिष्ठ सदस्यानं सांगितलं.
कोविड काळात लालबागचा राजा मंडळाकडून केल्या जाणाऱ्या सामाजिक कामांसाठीच्या निधीची चणचण मंडळाला भासू लागली होती. त्यावेळी अनंत अंबानी यांनी पुढाकार घेऊन मंडळाला मोठी मदत केली होती. मंडळाच्या रुग्ण सहाय्य निधी योजनेसाठी अनंत अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशनने २४ डायलिसीस मशीन्स दिल्या होत्या.
"लालबागचा राजा मंडळाकडून केल्या जाणाऱ्या चॅरिटेबल सेवांसाठी अंबानी कुटुंबीयांकडून नेहमीच निधी मिळत आला आहे. त्यासोबत अनंत अंबानी यांचा मंडळाच्या कार्यांमध्ये विशेष सहभाग राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर अनंत अंबानी यांना मानद सदस्यत्व देण्यात आलं आहे", असं मंडळाच्या सदस्यानं सांगितलं.