Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेवर ४० जादा गाड्या, असं आहे वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 09:34 AM2021-08-06T09:34:46+5:302021-08-06T09:36:47+5:30
Ganeshotsav: गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने आणखी ४० जादा गाड्यांची घोषणा केली आहे. यापूर्वी ७२ उत्सव विशेष गाड्या जाहीर केल्या होत्या. त्यात याही गाड्यांची भर पडली आहे.
मुंबई : गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने आणखी ४० जादा गाड्यांची घोषणा केली आहे. यापूर्वी ७२ उत्सव विशेष गाड्या जाहीर केल्या होत्या. त्यात याही गाड्यांची भर पडली आहे.
या गाड्यांमध्ये मुंबई - सावंतवाडी रोड विशेष या गाडीच्या दोन फेऱ्या, पनवेल - सावंतवाडी रोड विशेष या गाडीच्या चार फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव विशेष या गाडीच्या ६ फेऱ्या आणि लोकमान्य टिळक टर्मिनस - कुडाळ विशेष या गाडीच्या ६ फेऱ्या, पनवेल - कुडाळ विशेष या गाडीच्या ६ फेऱ्या तसेच अतिरिक्त पनवेल - कुडाळ विशेष गाडीच्या ४ फेऱ्या, पुणे - मडगाव/करमळी - पुणे विशेष या गाडीच्या दोन फेऱ्या, पनवेल - करमळी/मडगाव - पनवेल विशेष या गाडीच्या दोन फेऱ्यांचा समावेश आहे.
त्याचबरोबर आधीच जाहीर केलेल्या विशेष ट्रेनच्या अतिरिक्त आठ फेऱ्या चालविण्यात येतील. या अतिरिक्त विशेष गाड्यांसाठी आणि आधीच घोषित केलेल्या विशेष गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. ७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तसेच, पश्चिम रेल्वेनेही तीन ते २१ सप्टेंबर या काळात आठ गाड्यांच्या ३८ विशेष फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील काही गाड्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे येथून सुटणार आहेत. तर उर्वरित गाड्या वसई मार्गे कोकणाकडे जातील.