गणेशोत्सव आणि लोककला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 01:52 AM2017-08-25T01:52:40+5:302017-08-25T01:52:44+5:30
पर्यावरण संतुलन,रूढी, परंपरा, प्रथा, श्रद्धा आदींची छाप लोककलांवर पडलेली दिसते. त्याचप्रमाणे समाजातील घडामोडींचे पडसादही या कलेवर उमटत आहेत. लोककलांचे माध्यमही आता आधुनिक/डिजिटल होत असल्याने रसिक प्रेक्षकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.
- पद्मजा जांगडे
पर्यावरण संतुलन,रूढी, परंपरा, प्रथा, श्रद्धा आदींची छाप लोककलांवर पडलेली दिसते. त्याचप्रमाणे समाजातील घडामोडींचे पडसादही या कलेवर उमटत आहेत. लोककलांचे माध्यमही आता आधुनिक/डिजिटल होत असल्याने रसिक प्रेक्षकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.
समाजात होणा-या बदलांचे पडसाद आपल्या जीवनशैलीवर उमटत असतात. त्याचप्रमाणे सण-उत्सवावरही होत असतात. जनजागृती आणि लोकोत्सवाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या उद्देशाने सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे रूपही दिवसेंदिवस बदलत गेले आहे. प्रामुख्याने कोकणात साजरा होणारा उत्सव आता देशभरातच नव्हे, तर जगभरात साजरा होऊ लागला
आहे. कोकणात या काळात भातलावणी झाली असल्याने शेतकरी काहीसा निवांत असतो. त्यामुळे या सणांमध्ये लोककलेचे प्रतिबिंब उमटलेले दिसते.
पूर्वी गणेशोत्सवात जाखडी/ बाल्या नाच हे लोकनृत्य सादर केले जायचे. आठ कलाकार वादकांच्या भोवती फेर धरायचे. ढोलकी आणि घुंगरू या पारंपरिक वाद्यांचा मेळ यात दिसायचा. मात्र कालांतराने त्यात बदल झाला असून, पारंपरिक वाद्याची जागा आधुनिक वाद्यांनी घेतली आहे; तर बाल्या डान्सच्या जागी आता गरबा, मंगळागौर सादर होऊ लागली आहे. उत्सवात पालखी नाचवण्याचा प्रकारही प्रामुख्याने कोकणातच पाहायला मिळतो. पालख्या नाचवण्यात रत्नागिरीची खास ओळख आजही आहे. काही ठिकाणी गणपतीच्या दहा दिवसांत भजनी मंडळाचे कार्यक्रम होतात. ग्रामीण भागात गणेशोत्सवात लोककलेचे दर्शन आजही पाहायला मिळते, मात्र शहरी भागात लोककला नामशेष होत चाललेली दिसते.
दहा दिवसांच्या गणेशोत्सवात सत्यनारायणाची पूजा ज्या दिवशी असते, त्या दिवशी फक्त भजनांचे कार्यक्रम असतात. उर्वरित दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम होताना दिसतात. काही मंडळांकडून या काळात मुलांसाठी चित्रकला, निबंध, क्रीडा स्पर्धा, हळदी-कुंकू अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गेल्या चार-पाच वर्षांत ग्लोबल वार्मिंगबाबत जनजागृती होत असल्याने गणेशोत्सवावरही त्याचे प्रतिबिंब उमटू लागले आहे. प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींची जागा शाडूच्या मूर्तींनी घेतली आहे. तर सजावटीच्या थर्माकॉल, चायना वस्तूंची जागा इको-फ्रेंडली सजावटीने घेतली आहे.
सजावटीच्या पद्धतीही बदलल्या असून, जवळपास सर्वच मंडळांकडून थीम घेऊन सजावट करण्यावर भर दिला जात आहे. यात ‘बेटी बचावो, बेटी पढाओ’, ‘स्त्रीभ्रूणहत्या’, ‘मातृभाषेला प्राधान्य द्या’, ‘घनकचरा निर्मूलन’ आदी समाजिक प्रबोधन करणाºया देखाव्यांबरोबरच क्रीडा, विज्ञान क्षेत्रातील प्रगती तसेच समाजातील दैनंदिन घडमोडींचे दर्शन घडविणाºया देखाव्यांनाही पसंती दर्शविण्यात येत आहे. गणेशोत्सवातील लोककलांचे माध्यम बदलले असले तरी त्याची पाळेमुळे आजही दिसून येत आहेत.
गणा धाव रे... गणा पाव रे...
कोकणात बाल्या नाच हे लोकनृत्य सादर केले जाते. यात ढोलकी आणि घुंगरू या पारंपरिक वाद्यांच्या सोबतीने फेर धरला जातो.