मुंबई : बीडीडी म्हणजे सण उत्सव आणि सण उत्सव म्हणजे बीडीडी; हे एक समीकरणच आहे. कारण प्रत्येक सणात येथे उत्साह संचारलेला असतो. चैतन्य असते. आजही या गोष्टी येथेच आहेत. उत्साह किंचित कमी आहे. कारण, पुनर्विकासाच्या नावाखाली सरकारने ना. म. जोशी मार्ग म्हणजे डिलाई रोडवरील बीडीडी चाळीमधील नागरिकांना वरळी येथील संक्रमण शिबिरात स्थलांतरित केले आहे. वरळी येथील संक्रमण शिबिरात देखील घरोघरी गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्याला उधाण आले आहे. हा उत्सव साजरा करताना आमची माणसे आमच्या बरोबर असती तर आणखी मजा आली असती, अशी प्रतिक्रिया रहिवाशांनी दिली आहे.
दक्षिण मध्य मुंबई म्हणजे लालबाग-परळ हा परिसर मुंबईची एका अर्थाने सांस्कृतिक राजधानी आहे. इथल्या सणांना, उत्सवांना एक वेगळीच झालर असते. बीडीडी चाळीतील सण, उत्सव म्हणजे जणू काही येथे चार चांदच लागतात. आजदेखील हा उत्साह कमी झालेला नाही. चैतन्य कमी झालेले नाही. मात्र वरळी आणि डिलाई रोड येथे विभागलेले रहिवासी आपल्या जुन्या आठवणींमध्ये रमतानाच संक्रमण शिबिरातदेखील उत्साहाने गणेशोत्सव साजरा करत आहेत. आज वरळी येथील संक्रमण शिबिरात मोठ्या दिमाखात घरगुती गणेशोत्सव साजरा केला जात आहे. येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात नाही. मात्र घरगुती गणेशोत्सवाला देखील सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप असते.
ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, डिलाई रोडवर ३२ चाळींचा आमचा एक माहोल वेगळा होता. आता संक्रमण शिबिरात मर्यादित खोल्या असल्याने तसा माहोल नाही. डिलाई रोडची मजा काही औरच आहे. तिकडे आजूबाजूला सार्वजनिक गणपती असायचे.
३२ चाळी असल्याने ३२ चाळींमधील सार्वजनिक गणपती, घरगुती गणपती असा माहोलच वेगळा होता. शिवाय ३२ चाळींचा मिळून एक गणपती; असा एक वेगळा उत्साह. त्यामुळे डिलाई रोडवरील वातावरण थोडे वेगळे असायचे. पण, आता पाच इमारती रिकाम्या झाल्या आहेत. त्यामुळे ती मजा राहिली नाही कदाचित. २९० भाडेकरू आहेत. मात्र हे देखील सगळे एकत्र नाहीत. ते विभागले गेले आहेत. काही वरळीला आहेत. काही प्रकाश कॉटन, लोअर परळला आहेत. काही लालबागला आहेत. त्यामुळे उत्साह कमी असला तरी चैतन्य तेच आहे. कारण गणपती घरात येणे हीच मोठी गोष्ट आहे. शिवाय गणेश उत्सवच असा आहे की त्याने सगळ्यांना उत्साह येतो. वरळी येथील संक्रमण शिबिरातदेखील उत्साह तोच आहे. मात्र आता जेव्हा आमचा पुनर्विकास होईल. आम्ही मोठ्या घरात जाऊ तेव्हा उत्साह आणखी असेल यात तिळमात्र शंका नाही.