मुंबई : कोरोनाच्या काळात इंधन दरवाढ झाल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला. बाजारात दाखल होणाऱ्या सर्व वस्तूंच्या दरामध्ये वाढ झाली. गणेशोत्सवाच्या काळात सजावटीचे साहित्य मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. सजावट साहित्याच्या किमती १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
गणेशोत्सवाजवळ येताच सर्वांना गणेशोत्सवासाठी करण्यात येणाऱ्या सजावटीचे वेध लागतात. काहीजण याची महिनाभर आधीपासून तर काहीजण आठवडाभर आधीपासून तयारी सुरू करतात. मुंबईतील अनेक बाजारपेठा या सजावटीच्या साहित्यांनी फुलून गेल्या आहेत. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करायचा असला तरीदेखील सजावट मात्र आकर्षक झालीच पाहिजे असा प्रत्येकाचा आग्रह असतो. त्यामुळे दरवर्षी प्रत्येक जण सजावटीचे साहित्य खरेदी करतो.
यंदा मुंबईत चिनी बनावटीच्या वस्तू कमी प्रमाणात दाखल झाल्या आहेत. ग्राहकदेखील भारतीय बनावटीच्या वस्तूंना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे बाजारात सजावट साहित्याच्या नवीन व्हरायटी कमी प्रमाणात दिसून येत आहेत. तसेच पुरवठादेखील कमी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्यावर्षी ३० ते ७० रुपयांना मिळणारे कृत्रिम फुलांचे गुच्छ, तोरण व माळा यंदा ५० ते १०० रुपयांना मिळत आहेत. तसेच गेल्या वर्षी १०० ते १२० रुपयांना उपलब्ध असणारे एलईडी दिव्यांचे तोरण यंदा १५० रुपयांना विकले जात आहे. त्यातही भारतीय बनावटीचे एलईडी तोरण असल्यास ते २०० रुपयांना मिळत आहे. यंदा दीड ते दोन फुटांच्या गणपतीसाठी साध्या स्वरूपाचे मखर तीन हजार रुपयांना विकले जात आहे, तर इको फ्रेंडली माखरांची किंमत २ हजार रुपयांपासून सुरू होत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नागरिकांचा खिसा मात्र रिकामा होत आहे.
प्रवीण मेस्त्री (सजावट साहित्य विक्रेते) - भारतीय बनावटीच्या वस्तूंपेक्षा चिनी बनावटीच्या वस्तू स्वस्त असतात मात्र कोरोनामुळे त्या वस्तू बाजारात कमी प्रमाणात दाखल झाल्या आहेत. तसेच यंदा इंधनाचे दर वाढले असून, गाळ्यांचे भाडेदेखील वाढले आहे. त्यामुळे वस्तू महाग झाल्या आहेत.
विनिता कामटे (ग्राहक) - गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करायचा असला तरीदेखील तो साजरा करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू तर दरवर्षी द्याव्याच लागणार. महागाई वाढली आहे हे नक्की मात्र सण धुमधडाक्यातच साजरा झाला पाहिजे.