गणेशोत्सवातील सजावट साहित्य १५ टक्क्यांनी महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:10 AM2021-09-05T04:10:13+5:302021-09-05T04:10:13+5:30

मुंबई : कोरोनाच्या काळात इंधन दरवाढ झाल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला. परिणामी बाजारात दाखल होणाऱ्या सर्व वस्तूंच्या दरामध्ये वाढ झाली. ...

Ganeshotsav decorations go up by 15 per cent | गणेशोत्सवातील सजावट साहित्य १५ टक्क्यांनी महागले

गणेशोत्सवातील सजावट साहित्य १५ टक्क्यांनी महागले

Next

मुंबई : कोरोनाच्या काळात इंधन दरवाढ झाल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला. परिणामी बाजारात दाखल होणाऱ्या सर्व वस्तूंच्या दरामध्ये वाढ झाली. गणेशोत्सवाच्या काळात सजावटीचे साहित्य मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. मात्र आता या सजावट साहित्याच्या किमती १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

गणेशोत्सव जवळ येताच सर्वांना गणेशोत्सवासाठी करण्यात येणाऱ्या सजावटीचे वेध लागतात. काहीजण याची महिनाभर आधीपासून तर काहीजण आठवडाभर आधीपासून तयारी सुरू करतात. गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी बाजारांमध्ये विविध प्रकारचे एलईडी दिवे, तोरण, कृत्रिम फुले, मखर, स्प्रे पेंट, चमकदार झुंबर, माळा, विविध प्रकारची नक्षी असलेले स्टिकर या वस्तू दाखल झाल्या आहेत. मुंबईतील अनेक बाजारपेठा या सजावटीच्या साहित्यांनी फुलून गेल्या आहेत. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करायचा असला तरी देखील सजावट मात्र आकर्षक झालीच पाहिजे असा प्रत्येकाचा आग्रह असतो. त्यामुळे दरवर्षी प्रत्येकजण सजावटीचे साहित्य खरेदी करतो.

यंदा मुंबईत चिनी बनावटीच्या वस्तू कमी प्रमाणात दाखल झाल्या आहेत. ग्राहक देखील भारतीय बनावटीच्या वस्तूंना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे बाजारात सजावट साहित्याच्या नवीन व्हरायटी कमी प्रमाणात दिसून येत आहेत. तसेच पुरवठा देखील कमी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

असे वाढले दर

गेल्यावर्षी ३० ते ७० रुपयांना मिळणारे कृत्रिम फुलांचे गुच्छ, तोरण व माळा यंदा ५० ते १०० रुपयांना मिळत आहेत. तसेच गेल्या वर्षी १०० ते १२० रुपयांना उपलब्ध असणारे एलईडी दिव्यांचे तोरण यंदा १५० रुपयांना विकले जात आहे. त्यातही भारतीय बनावटीचे एलईडी तोरण असल्यास ते २०० रुपयांना मिळत आहे. यंदा दीड ते दोन फुटांच्या गणपतीसाठी साध्या स्वरूपाचे मखर ३ हजार रुपयांना विकले जात आहे. तर इको फ्रेंडली माखरांची किंमत २ हजार रुपयांपासून सुरू होत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नागरिकांचा खिसा मात्र रिकामा होत आहे.

प्रवीण मेस्त्री (सजावट साहित्य विक्रेते) - भारतीय बनावटीच्या वस्तूंपेक्षा चिनी बनावटीच्या वस्तू स्वस्त असतात मात्र कोरोनामुळे त्या वस्तू बाजारात कमी प्रमाणात दाखल झाल्या आहेत. तसेच यंदा इंधनाचे दर वाढले असून गाळ्यांचे भाडे देखील वाढले आहे. त्यामुळे वस्तू महाग झाल्या आहेत.

विनिता कामटे (ग्राहक) - गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करायचा असला तरी देखील तो साजरा करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू तर दरवर्षी द्याव्याच लागणार. महागाई वाढली आहे हे नक्की मात्र सण धुमधडाक्यात साजरा झाला पाहिजे.

Web Title: Ganeshotsav decorations go up by 15 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.